अजित पवारांसह राष्ट्रवादी काँग्रेसचा एक मोठा गट शिंदे – फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाला आहे. त्यातील अजित पवार यांनी स्वतः उपमुख्यमंत्रीपदाची तर त्यांच्या सहकाऱ्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. यामुळे महायुतीत समन्वय साधण्यासाठी या तिन्ही पक्षांनी एक समन्वय समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.
राज्यात भाजप, शिवसेना (शिंदे गट) व राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) असे 3 पक्षांचे सरकार आहे. या पक्षांत वादविवाद होऊ नये, तसेच त्यांच्यात समन्वय राखण्यासाठी एक समन्वय समिती स्थापन करण्यात आली आहे. त्यात तिन्ही पक्षांतील प्रत्येकी 4 सदस्यांचा समावेश करण्यात आला आहे. या सदस्यांत समन्वय साधण्याचे काम भाजप नेते प्रसाद लाड करणार आहेत.
कोण-कोण आहे समितीत?
भाजपकडून या समितीत चंद्रशेखर बावनकुळे, चंद्रकांत पाटील, प्रसाद लाड आणि आशिष शेलार यांचा समावेश आहे. तर शिवसेनेकडून उदय सामंत, शंभूराज देसाई, दादा भुसे व राहुल शेवाळे यांचा समावेश आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून (अजित पवार गट) या समितीवर सुनील तटकरे, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील व धनंजय मुंडे यांचा समावेश करण्यात आला आहे.
Join Our WhatsApp Communityदुसरीकडे, राज्यात सध्या मंत्रिमंडळ विस्ताराच्या जोरदार हालचाली सुरू आहेत. पण राष्ट्रवादीच्या 9 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेऊन आठवडा लोटला तरी अद्याप त्यांना खातेवाटप झाले नाही. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तारासह खाते वाटप कधी होणार? याकडे अवघ्या राज्याचे लक्ष लागले आहे.