स्वप्नील लोणकरच्या कुटुंबावरील भाजपने ‘इतके’ कर्ज फेडले!

शिवशंकर ग्रामीण बिगरशेती पतसंस्था मर्यादित या संस्थेचे लोणकरच्या कुटुंबावर कर्ज होते.

65

एमपीएससी परीक्षा पास होऊन सुद्धा मुलाखती होत नसल्याने नैराश्यातून आत्महत्या केलेल्या स्वप्नील लोणकरच्या कुटुंबीयांवर असलेल्या 19 लाख 96 हजार 965 रूपयांच्या कर्जाची परतफेड करणारा धनादेश गुरुवारी, २२ जुलै रोजी भारतीय जनता पार्टीच्या वतीने माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सुपूर्द केला.

देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते धनादेश सुपूर्द 

देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून हा छोटेखानी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. स्वप्निल लोणकरचे वडील सुनील तात्याबा लोणकर यांना हा 19 लाख 96 हजार 965 रूपयांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. शिवशंकर ग्रामीण बिगरशेती पतसंस्था मर्यादित या संस्थेचे या कुटुंबीयांवर कर्ज होते. आधीच स्वप्निलची आत्महत्या, त्यातून घरातील प्रिटींग प्रेस बंद आणि अशात पतसंस्थेकडून कर्जाचा तगादा यामुळे हे कुटुंब त्रस्त होते. अखेर या कर्जाची रक्कम त्या कुटुंबीयांना भारतीय जनता पार्टीच्या वतीने देऊन त्यांना दिलासा देण्यात आला. यावेळी विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, गिरीश महाजन, गोपीचंद पडाळकर, मंगेश चव्हाण आणि इतरही नेते उपस्थित होते.

याआधी एकनाथ शिंदेंचा मदतीचा हात

शिवसेना नेते आणि नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वप्नीलच्या कुटुंबीयांची भेट घेत त्यांचा धीर देण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर  स्वप्नीलच्या कुटुंबियांना शिवसेनेकडून 10 लाख रुपये मदत देण्यात आल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. स्वप्नीलच्या बहिणीच्या शिक्षणासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी सांगितले होते. स्वप्नील लोणकरच्या कुटुंबियांची भेट घेतल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला होता. त्यावेळी एमपीएससीचा कारभार पारदर्शक असला पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली. तसेच प्रलंबित भरती प्रक्रिया लवकरात लवकर सुरु होईल, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले होते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.