BMC मध्ये टेंडर घोटाळा करणाऱ्यांना बोलण्याचा नैतिक अधिकार नाही, दरेकरांचा घणाघात

147

गेली २५ वर्ष मुंबई महापालिका उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या ताब्यात होती. ठाकरे परिवाराने मुंबई महानगरपालिकेला अक्षरशः लुटण्याचे काम केले आहे. आता सत्ता गेल्यानेच आदित्य ठाकरे टीका करत आहेत. महापालिकेत टेंडर घोटाळा करणाऱ्यांना टेंडर, ट्रान्सपोर्टवर बोलण्याचा नैतिक अधिकार उरत नाही अशी टीका विधान परिषदेतील भाजपाचे गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी केली.

काय म्हणाले दरेकर

मुंबई महानगरपालिकेत अनुभव नसताना रस्त्याचे कंत्राट घेणाऱ्याला पेंग्विनचे कंत्राट दिले. महापालिकेच्या दिशाभूल केल्याबद्दल १ कोटीचा दंड त्यावेळी झाला. पेंग्विनवर ६० कोटी रुपये खर्च केले. पेंग्विनची किंमत आणि देखभालीचा खर्च किती? आदित्य ठाकरे यांच्या बालहट्टापायी करोडो रुपयांची उधळण केली. केवळ टक्केवारी न मिळाल्यामुळे देवनार प्रकल्प रखडला. आता आदित्य ठाकरे टेंडरवर बोलत आहेत. कोस्टल रोड प्रकल्पात कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार झाला. आम्ही चौकशीची मागणी केली. मात्र, त्यावर चौकशी झाली नाही याचे उत्तर आदित्य ठाकरे यांनी मुंबईकरांना द्यावे, असे प्रविण दरेकर म्हणाले.

(हेही वाचा – Zomato Layoff: आता झोमॅटोच्या कर्मचाऱ्यांवरही नोकरीची टांगती तलवार, अशी आहे कंपनीची योजना)

पुढे ते म्हणाले, मुंबई महानगरपालिकेत कोरोना काळात अवाजवी खर्च केला गेला. त्याचीही चौकशी झाली नाही. खाजगी सुरक्षा कंत्राट घोटाळा झाला याची कल्पना आदित्य ठाकरे यांना नव्हती का? असा सवाल आमदार प्रवीण दरेकर यांनी केला. आम्ही मुंबईचे तेच प्रश्न घेऊन मुंबईचा जागर करण्यासाठी आपल्यासमोर आलो आहोत, असेही आमदार दरेकर यांनी सांगितले.

शिवसेनेकडून मुंबईकरांच्या जीवनाशी खेळ

सिमेंट काँक्रिटकरणमध्ये ५०० कोटींचा घोटाळा झाला असे कॅगचा अहवाल आहे. मात्र आदित्य ठाकरे यांनी कधी कारवाई केली नाही. अधिकाऱ्यांच्या बदल्यात घोटाळा झाला आणि आता आदित्य यांनी मुंबईकराना त्याची उत्तरं द्यावी. मुंबईकरांच्या जीवनाशी खेळण्याचे काम शिवसेनेने केले आहे. मुंबईकरांच्या आयुष्याचा टाईमपास केला आहे. काळ्या यादीतील कंत्राटदारांना पुन्हा पुन्हा कामे का दिली ? याचे उत्तर आदित्य यांनी द्यावे. शिंदे- फडणवीस सरकारने मुंबईतील प्रत्येक रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्याची भूमिका घेतली आहे. त्यादृष्टीने काम मुंबईमध्ये सुरू झाले आहे. आता मुंबईकरांच्या श्रमाचा घामाचा पैसा वाया जाणार नाही. प्रत्येक मुंबईकराला चांगला रस्ता देण्याचे काम शिंदे – फडणवीस सरकार करेल आणि याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. मुंबई महापालिकेत भारतीय जनता पक्षाचा झेंडा फडकेल असा विश्वास आमदार प्रविण दरेकर यांनी व्यक्त केला.

मुंबई भारतीय जनता पार्टीच्या वतीने आयोजित ‘जागर मुंबईचा’ या अभियानंतर्गत जाहीर सभेत ते शनिवारी बोलत होते. वडाळा येथे भव्य सभा पार पडली. आमदार कालिदास कोळंबकर, आमदार प्रसाद लाड, नीरज उबारे, विजय डग्रे, राजेश्री शिरवडकर, स्नेहल शहा, गजेंद्र धुमाळे उपस्थित होते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.