२०२४ लोकसभा निवडणुकीची भाजपची ‘ब्लू प्रिंट’ तयार; मोदींच्या १०० सभा, तर मोठ्या प्रकल्पांची होणार घोषणा

108

आगामी २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीवर लक्ष केंद्रीत करून पक्ष विस्तारासाठी भाजपने योजना आखली आहे. त्यानुसार पश्चिम बंगाल, ओडिशा, दक्षिण भारतातील राज्यांवर भाजपचे लक्ष राहणार आहे. तसेच अल्पसंख्याक समुदाय आणि मागासवर्गीयांकडे विशेष लक्ष केंद्रीत करणार असल्याची माहिती पक्षांतर्गत सूत्रांनी दिली.

वर्षाच्या अखरेपर्यंत पंतप्रधान मोदींच्या सुमारे १०० सभा होणार

देशातील जवळपास सर्वच पक्ष आता लोकसभा निवडणूक २०२४च्या तयारीला लागले आहेत. या निवडणुकीसाठी भाजपनेही कंबर कसली आहे. ज्या राज्यांमध्ये भाजपाला आपली व्याप्ती वाढवायची आहे, अशा राज्यात या वर्षाच्या अखेरपर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुमारे १०० सभा होणार आहेत. तसेच यामाध्यमातून महिला, मागासवर्गीय आणि अल्पसंख्याक समुदायापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जाईल. दक्षिणेतील राज्य, ओडिशा आणि पश्चिम बंगालमधील १६० मतदारसंघांकडे विशेष लक्ष देऊन त्याठिकाणी जोरदार प्रचार करण्यावर भर दिला जाणार आहे.

केंद्र सरकारकडून मोठ्या प्रकल्पांची होणार घोषणा

तसेच ज्या राज्यांमध्ये भाजपाला फारसा जनाधार नाही, त्याठिकाणी केंद्र सरकारकडून मोठ्या प्रकल्पांची घोषणा केली जाईल. तसेच अशा राज्यांना चांगला निधी देण्यात येईल. भाजपाने यापूर्वीच महिला आणि अल्पसंख्याक समुदायावर लक्ष केंद्रीत करून विविध कार्यक्रम हाती घेतले आहेत. केंद्राच्या महिलांसाठी असलेल्या योजनांच्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्याची जबाबदारी महिला मोर्चाकडे देण्यात आली आहे. तर अल्पसंख्याक मोर्चाने १० राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांतील ६० लोकसभा मतदारसंघांची यादी तयार केली आहे. या मतदारसंघांत अल्पसंख्यांकांची लोकसंख्या ही ३० टक्क्यांहून अधिक आहे. त्यामुळे या मतदारसंघांवर अल्पसंख्याक मोर्चा विशेष लक्ष देईल.

निवडणुकीच्या प्रचाराचे धोरण ठरविण्यासाठी समितीची स्थापना

भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचे धोरण ठरविण्यासाठी एका समितीची स्थापना केली आहे. या ३ सदस्यीय समितीमध्ये सुनील बन्सल, विनोद तावडे आणि तरुण चुघ यांचा समावेश आहे. भाजपाच्या वेगवेगळा मोर्चा, विभाग आणि आमदार, खासदारांना देण्यात आलेले कार्यक्रम लोकांपर्यंत व्यवस्थित पोहोचत आहेत का? याचे निरीक्षण करून त्याचा अहवाल वरिष्ठ नेत्यांना देण्याचे काम ही समिती करेल. तसेच या कार्यक्रमात काही बदल, सुधार करायचे असल्यास तशा सूचनाही समितीकडून दिल्या जातील. विविध मोर्चा आणि राज्यांकडून येणाऱ्या माहितीच्या आधारे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा आणि इतर स्टार प्रचारकांना विविध कार्यक्रम आणि सभा घेण्यासाठीदेखील समितीकडून सूचना देण्यात येतील. पक्षाचे वरिष्ठ नेते आणि मंत्र्यांनादेखील एकेएका राज्याचे प्रभारीपद देण्यात येईल. या सर्व राज्यांवर देखरेख ठेवण्याचे काम ही ३ सदस्यीस समिती करेल. हे करत असताना प्रत्येक पातळीवर योग्य समन्वय राखला जाईल. तसेच एकही मुद्दा सुटू नये यासाठी सूक्ष्म नियोजन केले जाईल. विशेषतः दक्षिणेतील राज्ये, ओडिशा आणि पश्चिम बंगालवर विशेष लक्ष देण्यात येणार आहे, असेही भाजपामधील सूत्रांनी सांगितले.

अनुसूचित जाती प्रवर्गाला आपलेसे करण्यासाठी भाजपचा खास प्लॅन

यासोबतच भाजपने देशातील अनुसूचित जाती प्रवर्गाला आपलेसे करण्यासाठी खास प्लॅन तयार केला आहे. अनुसूचित जातींपर्यंत पोहोचण्यासाठी भाजपकडून ‘घर घर चलो’ अभियान राबविण्यात येणार असल्याचे वृत्त आहे. महत्वाचे म्हणजे लोकसभेच्या ५४३ जागांपैकी ८४ जागा अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव आहेत. यांपैकी, ६०-७० जागा जिंकण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याचे सूत्रांनी सांगितले.

(हेही वाचा – ‘या’ राज्यात सत्ता स्थापनेसाठी चक्क राष्ट्रवादीचा भाजपला पाठिंबा)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.