पाथर्डीतूनच विधानसभेची तयारी करा; भाजपाची पंकजा मुंडेंना स्पष्ट सूचना?

115

विधानसभेला तिकीट हवे असेल, तर पाथर्डीतूनच तयारी करा, अशा स्पष्ट सूचना भाजपा नेतृत्वाकडून पंकजा मुंडे यांना देण्यात आल्याचे कळते. त्यामुळे धनंजय मुंडे यांचा परळीतून लढण्याचा आणि भाजपा प्रवेशाचा मार्ग सूकर झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

सध्या राष्ट्रवादीत असले, तरी धनंजय मुंडे हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे मानले जातात. त्यांना पुन्हा भाजपात घेण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून प्रयत्न सुरू आहेत. परंतु, पंकजा मुंडे यांचा अडथळा असल्यामुळे या प्रयत्नांना फळ आलेले नाही. २०१९च्या निवडणुकीत पंकजा मुंडे यांचा पराभव झाल्यानंतर त्यांचा पक्षातील प्रभाव काहीसा कमी होत गेला. ही संधी हेरत धनंजय मुंडे यांच्या परतीच्या प्रवासाचे नियोजन सुरू करण्यात आले आहे.

सुरुवातीला लोकसभा वा विधानसभा यापैकी कोणतेही एकच तिकिट पंकजा मुंडे यांच्या घरात दिले जाईल, असे भाजपातर्फे कळवण्यात आले होते. मात्र, मुंडे नावाभोवतालची सहानुभूतीची लाट लक्षात घेऊन थेट तिकिट न कापता विधानसभेसाठी त्यांना दुसरा मतदारसंघ (पाथर्डी) निवडण्याची सूचना करण्यात आल्याची माहिती भाजपामधील अंतर्गत सूत्रांनी दिली. तसेच लोकसभेचे तिकिट प्रितम मुंडे यांना कायम ठेवण्याचे आश्वासनही देण्यात आले आहे.

…तर आमदारकी विसरा

पाथर्डी तालुक्यातील भारजवाडी येथील नारळी सप्ताहानिमित्त पंकजा यांनी केलेले शक्तिप्रदर्शन पाहता काही वरिष्ठ नेत्यांनी त्यांना या मतदारसंघातून तयारी करण्याचा सल्ला दिला आहे. भाजपाच्या मोनिका राजळे दोन टर्म पार्थर्डीच्या आमदार आहेत. मात्र, पंकजा यांनी होकार दर्शविल्यास राजळे यांचा पत्ता कापला जाऊ शकतो. आणि नकार दिल्यास आमदारकी विसरून पक्ष कायमस्वरूपी संघटन स्तरावर कार्यरत राहण्याची वेळ ओढवू शकते. त्यामुळे पंकजा मुंडे काय निर्णय घेतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

(हेही वाचा – व्याघ्रप्रकल्पाच्या धर्तीवर राज्यात हत्तीप्रकल्प राबविणार – सुधीर मुनगंटीवार)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.