उद्यानाला टिपू सुलतानचे नाव देण्यावरुन भाजपने उपसल्या विरोधाच्या तलवारी! शिवसेनेचा मात्र छुपा पाठिंबा

शेकडो हिंदूंना फाशी देणारा, हजारो मंदिरांचा विध्वंस करणारा, लाखो हिंदूंचे धर्मांतर करणारा, स्त्रियांवर अत्याचार करणारा शासक योग्य व महान असू शकतो काय?

गोवंडीतील उद्यानाला टिपू सुलतान उद्यान असे नाव देण्यास भाजपने तीव्र विरोध केला आहे. समाजवादी पक्षाच्या स्थानिक नगरसेविका रुक्साना सिद्दीकी यांनी मांडलेल्या या प्रस्तावावर प्रशासनाने सकारात्मक अभिप्राय दिला होता. त्यामुळे हा प्रस्ताव बाजार व उद्यान समितीपुढे मंजुरीला आला असता, भाजपने हा प्रस्ताव रद्द करण्याची मागणी केली. परंतु समितीच्या अध्यक्षा प्रतिमा खोपडे यांनी या उद्यानाचे काम पूर्ण नसल्याचे कारण पुढे करत, हा प्रस्ताव फेरविचारासाठी प्रशासनाकडे पाठवून देत, एकप्रकारे टिपू सुलतान यांचे नाव या उद्यानाला देण्यास छुपा पाठिंबाच दिला आहे.

अध्यक्षांनी काढला पळ

एम- पूर्व विभागातील प्रभाग क्रमांक १३६च्या नगरसेविका रुक्साना सिद्दीकी यांनी गोवंडीतील महापालिकेच्या उद्यानास ‘टिपू सुलतान उद्यान’ असे नाव देण्याची विनंती पत्राद्वारे केली होती. याबाबतच्या पत्रावर प्रशासनाने आपला सकारात्मक अभिप्राय दिला होता. हा प्रस्ताव गुरुवारी झालेल्या बाजार व उद्यान समितीच्या सभेत आला असता, शिवसेना नगरसेविका असलेल्या या समितीच्या अध्यक्षा प्रतिमा खोपडे यांनी या विषयाला बगल देत पळ काढला. या उद्यानाचे काम अद्याप पूर्ण न झाल्याने हा विषय आयुक्तांकडे फेरविचारार्थ पाठवावा, असे आदेश त्यांनी दिले.

(हेही वाचाः मुंबईतील उद्यानांना आता राणी लक्ष्मीबाई, टिपू सुलतान यांची नावे)

भाजपने मांडली महापौरांसमोर व्यथा

यावर भाजप नगरसेवक पंकज यादव यांनी उपसूचना मांडण्यासाठी वारंवार मागणी करुनही त्यांना उपसूचना मांडू दिली नाही. त्यामुळे बाजार व उद्यान समितीच्या सर्व भाजप सदस्यांनी याचा निषेध करत सभात्याग केला. त्यांनतर पंकज यादव, स्वप्ना म्हात्रे, रजनी केणी, रेणू हंसराज, हरिष छेडा, साक्षी दळवी, वैशाली पाटील आदी भाजपच्या सदस्यांनी अध्यक्षांच्या दालनात जाऊन त्यांना घेराव घालत जाब विचारला. त्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. त्यावेळी अध्यक्षांनी सभागृहातून पळ काढल्याने सर्व भाजप सदस्यांनी महापौरांना भेटून कशाप्रकारे लोकशाहीची मुस्कटदाबी होत आहे व नगरसेवकांना समिती सभेत बोलू दिले जात नाही, याची व्यथा मांडली.

सिद्दीकी यांची मागणी

टिपू सुलतान उद्यान नावाला आमचा विरोध आहे व सदर नामकरण आम्ही होऊ देणार नाही, प्रसंगी रस्त्यावर उतरू असा इशाराही भाजपच्या समिती सदस्यांनी दिला. सपाच्या नगरसेविकेने टिपू सुलतान यांचे नाव देण्याची शिफारस करताना, टिपू सुलतान हे भारताचे क्रांती सेनानी होते. योग्य शासक, महान योद्धा, विद्वान असे त्यांचे वर्णन केले आहे. भारताला इंग्रजांपासून मुक्त करण्यासाठी त्यांनी पहिला प्रयत्न केला होता, असे त्यांनी म्हटलेले आहे.

(हेही वाचाः दादरच्या कासारवाडी आणि प्रभादेवीतील सफाई कामगार वसाहतींचा पुनर्विकास रखडणार)

टिपू सुलतान हा कुशासक- भाजप

भाजपच्या नगरसेवकांनी सभेपूर्वी बाजार व उद्यान समितीच्या अध्यक्षांना दिलेल्या पत्रात असे म्हटले की, टिपू सुलतान उद्यान नामकरणाबाबतचा हा प्रस्ताव दफ्तरी दाखल करण्यात यावा. कारण टिपू सुलतान हा धर्मांध, क्रूरकर्मा, जुलमी, अत्याचारी व हिंदूद्वेष्टा राजा होता. टिपू सुलतान याने म्हैसूर राज्याला मुस्लिम राष्ट्र घोषित केले होते. या राज्यामध्ये सर्व हिंदूंचे धर्मांतर करुन त्यांना मुसलमान करण्याची घोषणा केली होती. लाखो हिंदूंची हत्या तथा कत्तल करत असताना, त्याने ४० हजार ख्रिश्चनांनाही बंदी बनवले होते. असा टिपू सूलतान हा धर्मांध, क्रूरकर्मा, अत्याचारी आणि दक्षिणेतील औरंगजेब म्हणून नावाजलेला कुशासक होता. त्यामुळे शेकडो हिंदूंना फाशी देणारा, हजारो मंदिरांचा विध्वंस करणारा, लाखो हिंदूंचे धर्मांतर करणारा, स्त्रियांवर अत्याचार करणारा शासक योग्य व महान असू शकतो काय, असा सवाल केला होता. त्यामुळे या उद्यानाला मौलाना आझाद, महामहीम अब्दुल कलाम, हविलदार अब्दुल हमीद अशा भारतमातेच्या थोर सुपुत्रांची नावे देण्यास भाजपचा संपूर्ण पाठिंबा असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

हा विषय जेव्हा पुकारला तेव्हा शिवसेना नगरसेविका ऋतुजा तारी यांनी या उद्यानाचे काम अद्याप पूर्ण झाले नसल्याची बाब निदर्शनास आणून दिली. त्यामुळे हा प्रस्ताव योग्यप्रकारे समजून घेण्याच्या दृष्टीकोनातून फेरविचारासाठी प्रशासनाकडे परत पाठवला आहे. पण याचे कोणी राजकारण करू नये. हा समितीच्या काजकाज प्रणालीचा भाग आहे.

 

-प्रतिमा खोपडे, अध्यक्षा, बाजार व उद्यान समिती

(हेही वाचाः विविध प्रकल्पांसाठी विशेष निधी निर्माणाचा प्रस्ताव स्थायी समितीने फेटाळला!)

ही मनुवादी मानसिकतेची माणसे आहेत. त्यांना राजकारण करण्याशिवाय काहीच येत नाही. भारताचा एक इतिहास आहे आणि त्यामध्ये टिपू सुलतान यांचेही नाव सुवर्णाक्षरात लिहिलेले आहे. त्यांचे योगदान मोठे आहे म्हणून आमच्या नगरसेविकेने त्यांचे नाव देण्याची मागणी केली होती. भाजपने उघडपणे विरोध केला, तर शिवसेनेने हा प्रस्ताव फेरविचारासाठी पाठवून देत दोघेही एकाच मापदंडाचे असल्याचे दाखवून दिले. परंतु आम्ही या उद्यानाला टिपू सुलतान यांचे नाव देऊनच राहणार.
-रईस शेख, गटनेते, समाजवादी पक्ष

हिंदू जनजागृती समितीसह हिंदुत्ववाद्यांचाही विरोध 

समाजवादी पक्षाच्या नगरसेविका रुक्साना सिद्दीकी यांनी गोवंडीतील महापालिकेच्या उद्यानाला टिपू सुलतानचे नाव देण्याची मागणी केली. त्यानंतर हिंदुत्ववादी संघटनांनीही विरोध केला. हिंदू जनजागृती समितीसह अन्य हिंदुत्ववादी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी महापौर किशोरी पेडणेकर यांची भेट घेतली आणि त्यांना या उद्यानाला टिपू सुलतानचे नाव देण्यास लेखी निवेदनाद्वारे विरोध दर्शवला. त्यावर टिपू सुलतान याचे मुंबईसाठी योगदान काय? त्याचे नाव इथे कशासाठी? याविषयी प्रशासकीय नियमांची पडताळणी करून मी लक्ष घालते, असे आश्वासन यावेळी महापौर पेडणेकर यांनी हिंदुत्ववादी संघटनांना दिले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here