महापालिका मुख्यालयासमोर भाजपा ‘अशी’ करणार गांधीगिरी!

गांधी जयंतीचे औचित्य साधून खड्डयांच्या मुद्द्यावर आंदोलन करण्याऐवजी खड्ड्यांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन भरवत गांधीगिरीने आंदोलन करण्यात येणार आहे.

97

मुंबईतील खड्ड्यांवरून राजकारण तापलेले असताना भाजपाने प्रत्येक खड्ड्यांचे फोटो मागवून घेत त्यांचे प्रदर्शन भरवण्याचा निर्णय घेतला आहे. २ ऑक्टोबर या महात्मा गांधी जयंतीच्या दिवसाचे औचित्य साधून भाजपा गांधीगिरीच्या मार्गाने खड्ड्यांबाबत मार्गदर्शन करणार आहे. महापालिका मुख्यालयासमोरच हे आंदोलन केले जाणार आहे. आज जरी मुंबईकर खड्ड्यातून चालत असले, तरी २०२२ नंतर भाजपाची सत्ता महापालिकेत आल्यास मुंबईतील रस्ते चकाचक आणि तुळतुळीत झालेले पहायला मिळतील, असाही संदेश खड्ड्यांच्या फलकांद्वारे दिला जाणार आहे.

खड्ड्यांसोबतच्या सेल्फींचे स्पर्धा प्रदर्शन भरण्याचा निर्णय   

मुंबईतील खड्ड्यांबाबत जनता त्रस्त असून सत्ताधारी पक्षाचे याकडे लक्ष नाही. महापौर म्हणतात पुढील दोन-चार दिवसांमध्ये खड्डे बुजवले जातील. पण केवळ खड्ड्यांचे आकडे दाखवून आकडेवारींचा खेळ सुरु आहे. पण खड्ड्यांच्या खेळात सर्वसामान्य जनता बेहाल झालेली आहे. प्रशासन आणि सत्ताधारी म्हणते केवळ ९२७ खड्डे आहेत म्हणून. पण मुंबईतील रस्त्यांची खड्डयांमुळे चाळण झालेली आहे. प्रशासन आणि सत्ताधारी शिवसेना पक्ष केवळ खड्डे बुजवण्याचे आश्वासन देत असले तरी खड्डे काही बुजवले जात नाही. त्यामुळे भाजपाचे दक्षिण मध्य मुंबईचे जिल्हाध्यक्ष राजेश शिरवडकर यांनी सेल्फी विथ खड्डा ही मोहीम राबवून लोकांकडून आलेल्या खड्ड्यांसोबतच्या सेल्फींचे स्पर्धा प्रदर्शन भरण्याचा निर्णय घेतला.

(हेही वाचा : भावना गवळींना ‘वर्षा’ वर ‘नो एन्ट्री’?)

 गांधी जयंतीचे औचित्य साधून खड्ड्यांच्या मुद्द्यावर आंदोलन  

मागील तीन दिवसांपासून जनतेकडून मागवलेल्या या मोहिमेतंर्गत मोठ्या प्रमाणात प्रतिसाद लाभला आहे. त्यामुळे या आलेल्या खड्डयांसोबतच्या सेल्फींचे प्रदर्शन भाजपा महापालिका मुख्यालय येथे सेल्फी पॉईंटजवळ भरवले जाणार आहे. गांधी जयंतीचे औचित्य साधून खड्डयांच्या मुद्द्यावर आंदोलन करण्याऐवजी खड्ड्यांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन भरवत गांधीगिरीने आंदोलन करण्यात येणार आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन भाजपाचे आमदार आशिष शेलार यांच्या हस्ते होणार आहे. या प्रदर्शनाला दक्षिण मुंबईचे भाजपा जिल्हाध्यक्ष शरद चिंतनकर आदी उपस्थित राहणार आहे. शनिवारी दुपारी १२ वाजता हे प्रदर्शन भरवले जाणार आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.