भाजप बहुजनविरोधी पक्ष! नाना पटोलेंची टीका

काँग्रेसच्या महागाईविरोधी आंदोलनाला मोठा प्रतिसाद मिळत आहे. त्यावरून लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी माझ्या भाषणातील क्लिप काढून दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला, असे नाना पटोले म्हणाले.

127

बहुजनांचा चेहरा असलेले गोपीनाथ मुंडे, एकनाथ खडसे यांच्यासारख्या नेत्यांची भाजपने बदनामी केली. फडणवीसांनी खडसेंसारख्या बहुजन समाजाच्या नेत्याला अपमानित केले. आता गोपीनाथ मुंडेंच्या दोन्ही मुलींची तीच स्थिती आहे, यावरून भाजप हा ओबीसींच्या विरोधातील पक्ष आहे, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली.

केंद्र सरकार जनतेला लुटत आहे!

केंद्र सरकारने देशाला लुटायचा प्रयत्न सुरू केला आहे. त्याला काँग्रेसकडून विरोध केला जाणार आहे. केंद्र सरकार रोज पेट्रोल, डिझेलच्या किंमती वाढवत आहे. चीनचे सैन्य देशात घुसले, त्याबाबत देखील भाजपा काही उत्तर देत नाही. या सगळ्या विषयांवरून लक्ष दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न सुरू आहे. राज्यात काँग्रेस नेत्यांमध्ये गोंधळ आहे, असे माध्यमांच्या माध्यमातून कुणी पेरत आहे, ते चुकीचे आहे, असेही पटोले म्हणाले.

(हेही वाचा : खडसेंची चौकशी करणा-या ‘त्या’ समितीचा अहवाल गहाळ)

महा आघाडीला बदनाम करण्याचा प्रयत्न!

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री माझ्यावर लक्ष ठेवतात असे माध्यमांनी वाढवून सांगितले. खरे तर हा सर्वसाधारण प्रकार आहे. माध्यमांवर देखील राज्य आणि केंद्र सरकारचे लक्ष असते. आपण जे काही बोलतोय, त्यावर देखील त्यांचे लक्ष असते, त्यामुळे महाविकास आघाडीत आलबेल नाही, असा निष्कर्ष काढण्यात आला, हा चुकीचा आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये एकमत आहे. राज्याच्या विकासाचे आमचे धोरण आहे. त्या आधारावर हे सरकार चालत आहे. काँग्रेसच्या महागाईविरोधातल्या आंदोलनाला मोठा प्रतिसाद मिळतो आहे. त्यावरून लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी ३ दिवसांपूर्वीच्या माझ्या एका भाषणातली क्लिप काढून दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. आमच्याबद्दल असे कितीही कटकारस्थान केले, तरी काँग्रेस जनतेचे प्रश्न मांडत राहणार आहे, असेही नाना पटोले म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.