लोकसभा निवडणुकीनंतर भारतीय जनता पार्टीचे सरकार जरी आले असले तरी भाजपाला स्पष्ट बहुमत मिळालेले नाही. अन्य पक्षांच्या कुबड्या घेऊनच सरकार चालवावे लागणार आहे. तसेच भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्यात मतभेद असल्याचे देखील सांगितले जातंय. दोन्ही बाजूंनी याला नकार देण्यात आला असला तरी अद्याप चर्चा थांबलेल्या नाहीत. त्या पार्श्वभूमीवर गेल्या आठवड्यात भाजपाने (BJP) दोन असे निर्णय घेतले आहेत की त्यातून या चर्चांना पूर्णविराम मिळेल, अशी अपेक्षा आहे.
पहिला निर्णय सरकारी आहे कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कामात भाग घेण्याची जी बंदी १९६६ पासून लागू होती ती आता हटवण्यात आली आहे व दुसरा निर्णय म्हणजे काहीच दिवसांपूर्वी भाजपाने विविध राज्यांचे नवे राज्यपाल नियुक्त केले आहेत आणि पक्षाचे प्रभारी म्हणून ज्या नेत्यांची नियुक्ती करण्यात आली आहे ते बहुतांश जण संघाशी संबंधित आहेत. राष्ट्रपतींनी नव्याने नियुक्त केलेल्या राज्यपालांची एक यादी जाहीर केली तर काही राज्यपालांकडे अन्य राज्यांचा कार्यभार सोपवण्यात आला. राज्यपालांची यादी पाहिली तर एक बाब लक्षात येते व ती म्हणजे भाजपाने जातीचे समीकरण तर साधले आहेच, मात्र ज्या नेत्यांची पार्श्वभूमी संघाची आहे, अशांना अधिक महत्त्व देण्यात आले आहे.
(हेही वाचा – Parliament Session : निवडणूक लढवण्यासाठीची वयोमर्यादा कमी होणार का? संसदेत चर्चा)
संतोष गंगवार :
उत्तर प्रदेशात लोकसभा निवडणुकीत यादव आणि ओबीसी मतदारांच्या नाराजीचा फटका भाजपाला बसला आहे. यामुळे गंगवार अनुभवी आणि शक्तिशाली कुर्मी नेते आहेत. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत त्यांना तिकीट नाकारण्यात आले व त्यामुळे नाराज झालेल्या कुर्मी समुदायाने भाजपाला (BJP) बरेली, आंवला आणि बदायू या मतदारसंघात फटका दिला. गंगवार यांना राज्यपाल करून सक्रिय राजकारणातून निरोप देण्यात आला असला तरी कुर्मी मतदारांना एक स्पष्ट संदेश पक्षाकडून दिला गेला आहे. गंगवार यांची पार्श्वभूमीही संघाचीच आहे.
लक्ष्मण आचार्य :
उत्तर प्रदेशातील आणखी एक मोठे नाव लक्ष्मण आचार्य यांना आसामचे राज्यपाल करण्यात आले आहे. ते निषाद समुदायातील खरवार जातीचे आहेत. उत्तर प्रदेशच्या पूर्वांचलमध्ये निषाद समुदायाचे प्राबल्य आहे. लोकसभेत दलित मतदार भाजपापासून (BJP) दूर गेलेला दिसला. आता आचार्य यांना पद देत भाजपाने निषादांना जोडण्याचा प्रयत्न केला आहे आणि तेही संघाशी संबंधित आहेत.
ओम माथुर :
पंतप्रधान मोदी यांचे निकटवर्तीय ओम माथुर यांना सिक्कीमचे राज्यपाल करण्यात आले आहे. ते प्रदीर्घ काळ गुजरातमध्ये प्रभारी होते, त्यावेळी मोदी राज्याचे मुख्यमंत्री होते. तसेच हरिभाऊ बागडे, रमन डेका, जिष्णुदेव वर्मा, सी. एम. विजयशंकर, के, कैलाशनाधन आणि अन्य बहुतेक संघाची पार्श्वभूमी असलेल्या नेत्यांकडे राज्यपालपद, पक्षाचे प्रदेशाध्यक्षपद अथवा राज्याचे प्रभारीपद अशा प्रमुख जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या आहेत.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community