येत्या रविवारी म्हणजेच १६ एप्रिल २०२३ रोजी निरुपणकार डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना ‘महाराष्ट्र भूषण’ या महाराष्ट्रातील सर्वोच्च पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. हा पुरस्कार सोहळा खारघर येथील आंतरराष्ट्रीय कॉर्पोरेट मैदानावर सकाळी साडेदहा वाजता संपन्न होणार आहे. या सोहळ्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उपस्थित राहणार आहेत. त्या निमित्ताने अमित शहा दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर असणार आहेत.
१५ एप्रिल २०२३ च्या संध्याकाळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुंबईमध्ये दाखल होणार आहेत. त्यांनतर त्यांची भाजपच्या महत्वाच्या नेत्यांसोबत बैठक होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार ही बैठक सह्याद्री अतिथीगृहावर होणार असून यावेळी मुंबई महानगर पालिका निवडणूक आणि लोकसभेसाठी मिशन ४५ च्या विषयावर चर्चा होणार आहे. राज्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीचा आढावा देखील अमित शहा यावेळी घेणार आहेत.
(हेही वाचा –अमित शहांच्या दौऱ्यामुळे खारघरवासियांचं नशीब पालटलं; १५ ते २० वर्षात जे झालं नाही ते एका रात्रीत घडलं!)
निरुपणकार डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना ‘महाराष्ट्र भूषण’ हा पुरस्कार अमित शहा यांच्या हस्ते देण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे या सोहळ्याच्या नियोजनावर जातीने लक्ष देत आहेत. या सोहळ्यात अमित शहा सोबतच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमासाठी तब्बल १५ ते २० लाख समर्थक येतील असा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. त्या पार्श्वभूमीवर रविवार १६ एप्रिलच्या रात्री १२ पर्यंत पुणे-मुंबई द्रुतगती मार्ग आणि जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील अवजड वाहतूक बंद असणार आहे. तर हार्बर रेल्वेमार्गावरील मेगा ब्लॉकदेखील रद्द करण्यात आला आहे.
Join Our WhatsApp Community