मुंबई महापालिकेवर भगवा झेंडा फडकवण्याच्यादृष्टीकोनातून भाजपा कामाला लागली असून काही दिवसांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मुंबई भेटीवर आल्यानंतर भाजपाच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेत महापालिकेत १५० चा नारा दिला. मात्र, या भेटीमध्ये अमित शाह यांनी भाजपाचे मुंबई अध्यक्ष ऍड. आशिष शेलार यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी आणि नगरसेवकांचे चांगले कान टोचले असल्याची माहिती मिळत आहे. अमित शाह यांनी आपल्या या सभेमध्ये मुंबईतील सर्व भाजपाच्या पदाधिकाऱ्यांचे पाणी जोखत मुंबई अध्यक्षांचाही समाचार घेतला. भाजपाचे सर्व पदाधिकारी हे आजही सुखन्वये अवस्थेत असल्याचे सांगत अध्यक्षांना भ्रमात राहू नका, अशा प्रकारचा संदेश दिला आहे.
भाषणात अमित शाह म्हणाले…
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे मागील सोमवारी मुंबईत आले होते. त्यावेळी त्यांनी लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या मूर्तीचे दर्शन घेतल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शासकीय निवासस्थानी असलेल्या गणपतींचेही दर्शन घेतले. या भेटीमध्ये मेघदूर येथे भाजपाचे मुंबईतील मंडळ अध्यक्षांपर्यंतच्या सर्व पदाधिकाऱ्यांची सभा घेत त्यांना आगामी निवडणुकीबाबत मार्गदर्शन केले. मेघदूर येथील सभेमध्ये अमित शाह आपले मार्गदर्शनपर भाषण केल्यानंतर, कार्यक्रम आटोपल्यावर आशिष शेलार यांच्याकडे भाषणाबाबत कार्यकर्त्यांचे मत जाणून घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी शेलार यांनी अमित शाह यांना, आपल्या भाषणाने कार्यकर्त्यांमध्ये जोश आल्याचे सांगण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी शाह यांनी शेलारांना थांबवत, आपण चुकीचे बोलतात. सर्व पदाधिकारी सुखन्वये अवस्थेत असल्याचे मला पहायला मिळाल्याचे सांगितल्याचे सुत्रांकडून समजते.
(हेही वाचा भारत जोडो यात्रेसाठी राहूल गांधींचा 41,000 रुपयांचा टी-शर्ट)
कार्यकर्त्यांना दिले टार्गेट
दुसऱ्या दिवशी वसंत स्मृतीमध्ये बोलावलेल्या मुंबईतील भाजपा पदाधिकाऱ्यांसमोर बोलताना शेलार यांनी पुढे याचाच धागा पकडत पदाधिकाऱ्यांचे कान टोचण्याचा प्रयत्न केल्याचेही सुत्रांकडून समजते. विशेष म्हणजे मेघदूरमधील सभेत अमित शाह यांच्या भाषणापूर्वी शेलार यांनी नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना निवडणुकीसाठी कामाला लागा असे सांगत १३४ जागांचे टार्गेट देत युतीचा निर्णय वरिष्ठ घेतील असे सांगण्याचा प्रयत्न केला. परंतु शाह यांनी आपल्या भाषणात नंतर याचाच संदर्भ देत आप अब भी संभ्रम मे है, बीएमसी पे १३४ नहीं तो १५० जगा निकालने है. आणि हो बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना अर्थात शिंदे गटाच्या शिवसेनेसोबत युती होईल, यात कुणीही संकोच बाळगू नये, असे सांगण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे अमित शाह यांनी मुंबई भेटीमध्ये केवळ एका भेटीतच मुंबई अध्यक्षांसह पदाधिकाऱ्यांच्या डोक्यातील भ्रम काढून त्यांचे पाणी जोखूनही गेले. त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये मुंबई अध्यक्षांना डोळ्यात तेल घालून भाजपाचे नगरसेवक, जिल्हाध्यक्ष, मंडल अध्यक्ष तसेच वॉर्ड अध्यक्षांमध्ये जोश आणून काम करायला लावणे भाग पडणार आहे. केवळ कार्यकर्त्यांमध्ये जोश निर्माण झाला, या एका वाक्यात अमित शाह यांनी शेलारांना पकडल्याने शेलारांना हा जोश आता दाखवावा लागणार असल्याचे बोलले जात आहे.
Join Our WhatsApp Community