राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यासह भाजप नेत्यंनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी केलेली अवमानकारक वक्तव्ये, महाराष्ट्रातून अन्य राज्यात गेलेले प्रकल्प यांसह अनेक मुद्द्यांवर मुंबईत महाविकास आघाडीतर्फे 17 डिसेंबर रोजी मोर्चा काढण्यात येणार आहे. दरम्यान महाविकास आघाडीच्या या मोर्चाला उत्तर देण्यासाठी आता भाजपनेही कंबर कसली आहे. भाजपही शनिवारी मुंबईकत माफी मांगो आंदोलन करणार आहे. भाजप नेते आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेत ही माहिती दिली आहे. तसेच, यावेळी त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म महाराष्ट्रात झाला म्हणणा-या संजय राऊतांनाही लक्ष्य केले आहे.
राऊत यांनी भाई गिरकर यांनी आंबेडकरांसंबंधी दोन पुस्तके पाठवली असल्याची माहिती देत त्यांनी कुरिअरची पावतीही दाखवली. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आयुष्यावर आधारित दोन पुस्तके संजय राऊत यांना पाठवली आहेत. त्यांनी याचा अभ्यास करावा, असा टोला शेलार यांनी यावेळी लगावला.
( हेही वाचा: भारतात पेट्रोलची किंमत दुस-या देशांच्या तुलनेत सर्वात कमी; संसदेत केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांचे वक्तव्य )
बाबासाहेबांबाबत मुद्दाम वाद निर्माण करण्याचा प्रयत्न
बाबासाहेबांचा जन्म कुठे झाला यावर वाद निर्माण करण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरेंच्या पक्षाच्यावतीने सुरु आहे. तो जाणीवपूर्वक सुरु असून, त्यामागील कारणे अस्पष्ट आहेत. तालिबानच्या भागात गौतम बुद्धांच्या प्रतिमांवर हल्ला झाल्याचे आम्ही पाहिले होते. आता शांततापूर्ण आणि शांततेचा संदेश देणा-या गौतम बुद्धांचे अनुयानी असणारा समाज आणि त्यातही आमचे नेते डाॅक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मस्थानाचा वाद निर्माण केला जात आहे. हे का केले जात आहे, हा आमचा प्रश्न आहे, असे शेलार म्हणाले.
आपले अज्ञान पाजळण्याची एकही संधी संजय राऊतांनी सोडलेली नाही. डाॅक्टर चांगली औषधे देतो की, कंपाऊंडर या वादात मला पडायचे नाही, असा टोलाही त्यांनी लगावला. यांची मस्ती आंबेडकरांच्या जन्मस्थळांपर्यंत गेली आहे. ही खोटी माहिती पसरवणे अक्षम्य चूक आहे, असेही त्यांनी म्हटले.
Join Our WhatsApp Community