‘सामना’चे संपादक खासदार संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांची रोखठोक मुलाखत घेतली असून त्याचा काही भाग प्रसिद्ध करण्यात आला आहे. या मुलाखतीवर भाजप, एकनाथ शिंदे गट आणि मनसेकडून तीव्र प्रतिक्रिया येत आहे. अशातच भाजपचे नेते आशिष शेलार यांनी देखील प्रतिक्रिया देत असे म्हटले की, राज्याच्या मुख्यमंत्र्यांना कोणी पालापाचोळा म्हणणे हा महाराष्ट्राचा अपमान असून महाराष्ट्राला बदनाम करण्याचं कट कारस्थान सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
(हेही वाचा – “सगळा घरचाच मामला, अडीच वर्षे संपत्ती कमावली, आता सहानुभूती…” उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीवर ‘मनसे’ची प्रतिक्रिया)
…. हे महाराष्ट्राला मान्य नव्हे
महाराष्ट्रातील मुख्यमंत्र्यांना जर कुणी पालापाचोळा बोलत असेल तर हा महाराष्ट्राचा अपमान आहे. इतकेच नाही तर मुख्यमंत्र्यांना घालून पाडून बोलणं आणि अपमानीत करणं हे महाराष्ट्राला मान्य नव्हे, असेही शेलार यांनी म्हटले. आता महाराष्ट्रद्रोह होत नाही का, हा राज्याचा अपमान नाही का, असा सवालही शेलार यांनी यावेळी उपस्थित केला आहे.
भाजपाने व्यक्त केली नाराजी
पुढे ते असेही म्हणाले की, उद्धव ठाकरे तुम्ही सत्तेत असताना जसे जनतेशी वागलात, तसे आम्ही अजिबात वागणार नाही. तुम्ही सत्तेत मुख्यमंत्री पदी असताना जो तुम्हाला प्रश्न विचारेल, त्याच्या घरात घुसून तुम्ही मुंडन करत होतात. सोशल मीडियावर जो अनपेक्षित बोलेल त्यांच्या सोसायटीत जाऊन त्यांचे डोळे तुम्ही फोडले होते. पण आम्ही असे वागणार नाही, जर तुम्ही या पदावर असतात आणि सामनाच्या मुलाखती तुम्ही जो मुख्यमंत्र्यांकरता उल्लेख केला आणि तसाच उल्लेख जर चुकून तुमचा कोणी केला असता, तर तुमच्या लवंड्यांसह तुमचे कार्यकर्ते, तुम्ही कसे वागला असतात, याचाही विचार करा, असाही इशारा त्यांनी दिला. यासह उद्धव ठाकरे यांनी आपल्या मुलाखतीत बंडखोरांना पालापोचाळा म्हटल्यानंतर त्यावरून भाजपने आपली नाराजी व्यक्त केली आहे.