आम्ही टिळकांना उमेदवारी देतो, निवडणुक बिनविरोध करता का? चंद्रकांत पाटलांचं नाना पटोलेंना आवाहन

157

कसबा पेठ आणि चिंचवडची पोटनिवडणुक बिनविरोध करण्यासाठी भाजपसोबत मुख्यमंत्र्यांचेही प्रयत्न सुरू आहेत. यासाठी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून महाविकास आघाडीला विनंती करण्यात आली असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीही शरद पवार, अजित पवार आणि नाना पटोलेंना फोन केला होता. तसंच मुख्यमंत्र्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनाही पत्राद्वारे पोटनिवडणुका बिनविरोध करण्याचा आग्रह धरला आहे. आता भाजप नेते चंद्रकांत पाटलांनी कसबा पेठ मतदारसंघातील पोटनिवडणुकीत टिळकांना उमेदवारी देतो, निवडणुक बिनविरोधी करता का?, असं आवाहन नाना पटोलेंना केलं आहे.

रविवारी नाना पटोलेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पोटनिवडणुक बिनविरोधी करण्यासाठी फोन केल्याची माहिती दिली होती. त्यासंदर्भात एका वृत्तवाहिशी बोलताना नाना पटोले म्हणाले होते की, मुख्यमंत्र्यांनी फोन करून पोटनिवडणुक लढवण्याची परंपरा सांगितली. कुटुंबातील कोणी जात तर आपण ती जागा बिनविरोधी निवडून देतो, असे मुख्यमंत्री म्हणाले. पण भाजपने दुसऱ्यालाच उमेदवारी दिली आहे. टिळक कुटुंबातील भाजपने उमेदवार दिला नाही. म्हणून टिळक कुटुंबातील कोण नसल्यानं बिनविरोध करण्याचा प्रश्न नाही. त्यामुळे परंपरेचाही मुद्दा येतच नाही.

(हेही वाचा – पक्षाने घेतलेला निर्णय मान्य, मात्र मनात खंत; भाजपच्या उमेदवारीवरुन शैलेश टिळक नाराज)

नाना पटोलेच्या याच प्रतिक्रियेवर भाष्य करताना सोमवारी चंद्रकांत पाटलांनी आवाहन दिलं. ‘पोटनिवडणुक बिनविरोध करायची नसल्यामुळे नाना पटोले असं म्हणतात की, टिळकांच्या कुटुंबात उमेदवारी दिली असती तर आम्ही विचार केला असता. तर माझं नाना पटोलेंना आवाहन आहे की, आम्ही टिळकांना उमेदवारी देतो, तुम्ही बिनविरोध निवडणुक करता का? अजून ४८ तास आहेत.’

दरम्यान भाजपनं दोन्ही जागांवर उमेदवार निश्चित केला असून सोमवारी उमेदवार अर्ज भरला जाणार आहे. भाजपकडून चिंचवडमधून दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांची पत्नी अश्विनी जगताप यांना उमेदवारी दिली आहे. तर कसबा पेठेतून हेमंत नारायण रासने यांना उमेदवारी दिली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.