अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ३०० आमदारांना घरं बांधून देणार अशी घोषणा केली. या घोषणेवरून भाजपने आक्षेप घेतला. तर आमदार पळून जातील आणि सरकार पडेल म्हणून हा निर्णय घेतल्याची टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली. यासह त्यांनी राज्यभरात सुरू असलेल्या एसटीच्या संपासंदर्भात देखील वक्तव्य केले आहे. ते म्हणाले, एसटीचा संप मिटला नाही तर एक लाख घरे उद्ध्वस्त होतील. या संपामुळे विद्यार्थ्यांचे हाल असल्याने त्यांनी चिंता देखील व्यक्त केली.
काय म्हणाले चंद्रकांत पाटील?
एसटी कर्मचारी संपाविषयी चंद्रकांत पाटील म्हणाले, एसटीचा संप मिटला नाही तर एक लाख घरे उद्ध्वस्त होतील. या संपामुळे विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. अजित पवारांनी सगळे श्रेय घ्यावे, पण हा संप मिटवावा असे आवाहन त्यांनी केले आहे. एसटी संपाबाबत काही निर्णय घेतला तर आमदार पळून जातील अशी महाविकास आघाडीला भीती आहे त्यामुळे ते कोणताही ठोस निर्णय किंवा भूमिका घेत नसल्याचा टोलाही त्यांनी यावेळी लगावला आहे.
(हेही वाचा – शिवसेनेच्या प्रताप सरनाईकांना ED चा दणका! 11 कोटींची मालमत्ता जप्त)
हे सरकार आहे की दगड?
यापुढे ते असेही म्हणाले, एसटी कर्मचाऱ्यांचा संप हा रेकॉर्ड मोडणारा आहे. दत्ता सामंत यांच्या संपात एक लाख घरे उद्ध्वस्त झाली होती. तशीच गत एसटी कर्मचाऱ्यांची होण्याची शक्यता आहे. संप मिटला नाही तर एसटी कर्मचारी यांच्याबाबत देखील तेच होईल. हे सरकार आहे की दगड आहे. त्यांना सातवा वेतन आयोग द्या सर्व प्रश्न मिटतील, असेही पाटील म्हणाले. चंद्रकांत पाटील म्हणाले, अधिवेशनात माध्यमांशी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. आमदारांना कशाला घर कशाला हवं आहे. कुणी आमदार व्हायला नारळ दिला नव्हता. मी म्हणतो घर कशाला हवे. या लोकाना रोज डिप्लोमेसी करावी लागत आहेत. मुळात महाविकास आघाडीचे आमदार फुटू नये म्हणून ही घोषणा केली आहे.