महिलांवरील अत्याचारावरुन भाजपा आणि शिवसेनेत चांगलीच जुंपली आहे. भाजपा नगरसेविकेच्या कार्यालयातच महिलेचा विनयभंग करण्यात आल्याची घटना समोर येताच शिवसेनेने यावरुन भाजपावर जोरात टीका केली. पण डोंबिवलीतील अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना समोर येताच भाजपा महाराष्ट्र उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी आता कोणाचं थोबाड फोडायचं, असा सवाल शिवसेना खासदार संजय राऊत यांना केला आहे.
काय म्हणाल्या चित्रा वाघ?
बोरीवलीतील भाजपा नगरसेविका कार्यालयात महिलेचा विनयभंग झाल्याची घटना कळताच, शिवसेनेच्या महिला आघाडीने आक्रमक होत गुरुवारी मोर्चा काढला. यात चक्क मुंबई महापौर किशोरी पेडणेकर यांनीही सहभाग घेतला. यावेळी बोलताना त्यांनी आता भाजपाच्या महिला नेता कुठे आहेत असा सवाल करत, मी असते तर थोबाड फोडलं असतं, असे विधान केला. महापौरांच्या या विधानाला चित्रा वाघ यांनी प्रत्त्युत्तर देत संजय राऊत यांना प्रतिप्रश्न केला आहे. आता थोबाड कोणाचं फोडायचं सरकारचं की विरोधकांचं, याचं उत्तर खासदार संजय राऊत यांनी द्यावं, असे चित्रा वाघ यांनी म्हटले आहे.
(हेही पहाः थोबाड फोडीन वरुन चित्राताईंची महापौरांना शाब्दिक चपराक)
हे कायद्याचं राज्य आहे का?
डोंबिवलीतील भोपर गावात अल्पवयीन मुलीच्या अत्याचाराचा व्हिडिओ बनवून तिला ब्लॅकमेल करत तब्बल 9 महिने 33 नराधमांनी बलात्कार केला. या घटनेवरुन हे कायद्याचं राज्य आहे का?, असा संतप्त सवालही चित्रा वाघ यांनी सरकारला विचारला आहे.
राजकारण करण्याचा प्रयत्न
या सरकारच्या काळात आणखी किती महिलांचे लचके तोडले जाणार आहेत? डोंबिवली प्रकरणात कठोर पावले उचलणे गरजेचे आहे. महिलांच्या सुरक्षेबाबत चर्चा करण्यासाठी विशेष अधिवेशन घेण्यची सूचना राज्यपालांनी केली. त्याचे समर्थन करायचे सोडून सरकारमधील जबाबदार नेते विरोधी पक्षावर टीका करत राजकारण करण्याचा प्रयत्न करत आहेत, अशी घणाघाती टीका चित्रा वाघ यांनी केली.
(हेही वाचाः तुम्ही तुमची सत्ता सुरक्षित ठेवा, पण महिलांच्या सुरक्षेचे काय? भाजपाचा सवाल)
Join Our WhatsApp Community