राज्य सरकारच्यावतीने एसटी महामंडळात महिलांसाठी 50 टक्के सवलत देण्यास सुरुवात केली आहे. शुक्रवारपासून राज्यभरात या योजनेची अंमलबजावणीदेखील सुरु झाली आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी एसटीने प्रवास केला. नाशिक येथील ठक्कर ते मालेगाव असा बस प्रवास त्यांनी केला आहे.
चित्रा वाघ यांनी मानले सरकारचे आभार
भाजप महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांचा मालेगाव येथे मेळावा असून या मेळाव्यासाठी त्या अनेक महिलांसोबत एसटीच्या माध्यमातून रवाना झाल्या. यावेळी चित्रा वाघ म्हणाल्या की, शिंदे फडणवीस सरकारचे आभार त्यांनी राज्यभरातील महिलांसाठी विशेषत: ग्रामीण भागातील महिलांसाठी विशेष अशी योजना सुरु केली आहे. राज्यभरातील महिलांसाठी ही योजना फायदेशीर ठरणार आहे. राज्यातील महिलांचा पहिल्यांदा कोणीतरी विचार केला, सगळ्याच एसटी प्रवासातून महिलांना सरसकट सूट देण्यात आली आहे. पन्नास टक्के,एकदम ओक्के, अशी घोषणा देत त्यांनी सरकारचे आभार मानले.
नाशिक ते मालेगाव प्रवास आता फक्त 85 रुपये
नाशिक ते मालेगाव साधारण 165 रुपयांचे तिकीट आहे. मात्र, महिलांना आता अवघ्या 85 रुपयांत नाशिक ते मालेगाव प्रवास होणार आहे. नाशिक ते मालेगाव 120 किलोमीटर आहे. 165 रुपये न मोजता आता मात्र हा प्रवास अवघ्या 85 रुपयांत होत आहे.
( हेही वाचा: मला तोंड उघडायला लावू नका, नाहीतर महाराष्ट्रात स्फोट होतील; संजय राऊतांचा गंभीर इशारा )
सिलिंडरचे दरही येत्या दिवसांत कमी होतील
चित्रा वाघ पुढे म्हणाल्या की, सिलिंडरचे दरही येत्या दिवसांमध्ये कमी होतील. आपण बघितले की कोरोनाच्या काळामध्ये संपूर्ण देश ठप्प असताना, या देशातल्या प्रत्येकापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न झाला. त्यामुळे यातून सावरायला थोडा वेळ लागेल. मात्र देशातील प्रत्येक माणसाचे काम येणा-या दिवसात होईल. त्याचबरोबर येणा-या दिवसांमध्ये एसटी महामंडळ अधिक सशक्त करण्याचा प्रयत्न शिंदे -फडणवीस सरकार निश्चित करेल, असा विश्वास वाघ यांनी व्यक्त केला.