शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपने दिल्लीप्रमाणे महाराष्ट्रातही दंगल घडवण्याचा कट रचला होता, असा गंभीर आरोप केला. त्यावर बोलताना भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊत यांना आता काही कामधंदा राहिलेला नाही, त्यामुळे ते नैराश्यात गेले आहेत. त्यांच्यावर काय बोलायचे, अशा शब्दांत त्यांनी राऊतांच्या विषयाकडे दुर्लक्ष केले.
राऊत नैराश्यात गेलेले
शिवसेना नेते संजय राऊत यांनी रामनवमीच्या दिवशी देशातील अनेक भागात हिंसाचार झाला, विशेष म्हणजे जेथे जेथे निवडणुका आहेत, त्या राज्यांत या दंगली घडवण्यात आल्या, तसे महाराष्ट्रातही भाजपने दंगली घडवून आणण्याचा प्रयत्न केला, मात्र जनतेने त्याकडे दुर्लक्ष केले, असे राऊत म्हणाले. त्यावर भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी याकडे दुर्लक्ष करत संजय राऊत अतिशय फ्रस्ट्रेटेड व्यक्ती आहे. त्यांना सध्या काही कामधंदा उरलेला नाही. त्यांच्यावर कितीवेळा बोलायचे? अशी बोचरी टीका फडणवीसांनी केली.
(हेही वाचा मुस्लिम कार्यकर्त्यांकडून राज यांच्या भोंग्यांवरील भूमिकेचे समर्थन)
२०२४ ला कोल्हापूरची जागा भाजप जिंकणार
कोल्हापूर पोटनिवडणुकीत झालेल्या पराभवावरही भाष्य केले. निवडणुकीत आम्हाला मिळालेल्या मतांवर आम्ही समाधानी आहोत. आम्ही एकटे लढूनही आमच्या मतांमध्ये मोठी वाढ झाली आहे. आमच्याविरोधात तीन पक्ष एकत्र होते, तरीदेखील त्यांची मते वाढली नाहीत. कोल्हापूरमध्ये सहानुभूतीमुळे काँग्रेसचा विजय झाला. पण 2024 मध्ये कोल्हापूरची ही जागा आम्हीच जिंकणार, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. अयोध्येचा दौरा कुणीही करू शकतो. प्रभू रामचंद्र सर्वांचे दैवत आहेत. त्यांच्या दर्शनासाठी कुणी जात असेल तर त्यांचे स्वागतच आहे. आम्हीदेखील अनेकदा त्या ठिकाणी जात असतो. कोणाला तिकडे जावे वाटत असेल, तर त्यात गैर काही नाही. श्रीरामाचे भव्य मंदिर तिकडे होत आहे, ते पाहण्याची इच्छा होणे स्वाभाविक आहे, असे राज ठाकरे यांच्या अयोध्या दौराविषयी म्हणाले.
Join Our WhatsApp Community