यशवंत जाधव यांनी अवघ्या 24 महिन्यांत 38 मालमत्तांची खरेदी करणे हा भ्रष्टाचार असल्याचा पुनरूच्चार विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी नागपुरात केला. प्राप्तीकर विभागाकडून यशवंत जाधव आणि त्यांच्या पत्नी आमदार यामिनी जाधव यांच्या विविध मालमत्तांबाबतची चौकशी सुरु आहे.
कोरोना काळात भ्रष्टाचारच झाला
यासंदर्भात फडणवीस म्हणाले की, जाधवांच्या डायरीत नेमकी काय नोंद आहे हे मी पाहिलेले नाही. पण, आयकर विभाग त्या नोंदींबाबत योग्य ती चौकशी करेल. त्यामुळे याप्रकरणी याहून अधिक बोलणे योग्य होणार नाही. मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीचे माजी अध्यक्ष यशवंत जाधव यांनी कोरोनाच्या काळात 24 महिन्यांत 38 मालमत्तांची केलेली खरेदी हा भ्रष्टाचारच आहे. कोरोनाच्या नावावर नुसता भ्रष्टाचार चालला आहे. या संदर्भात मी सभागृहातही स्पष्टपणे बोललो होतो आणि ते आता सप्रमाण सिद्ध झाले आहे, असे फडणवीस यांनी सांगितले.
( हेही वाचा: 12 खासदारांचा बारामतीत गुप्त दौरा, शरद पवारांची घेणार भेट! )
मातोश्री कोण ?
यशवंत जाधव हे मुंबई महापालिकेचे माजी नगरसेवक व स्थायी समितीचे अध्यक्ष आहे. त्यांच्या एका डायरीतील नोंद उघडकीस आली आहे. 2018 ते 2022 च्या दरम्यान घड्याळ आणि दोन कोटी रुपयांच्या देवाणघेवाणीचा उल्लेख या डायरीत आहे. या डायरीत 50 लाख रुपयांचे घड्याळ आणि 2 कोटी रुपये “मातोश्री’ला देण्यात आल्याची नोंद आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वांद्रे येथील निवासस्थान “मातोश्री’ म्हणून ओळखले जाते. नवीन वर्षात गिफ्ट वाटण्यासाठी हे दोन कोटी रुपये दिले गेल्याचा आरोप आता किरीट सोमय्या यांनीही केला आहे. तर यशवंत जाधव यांनी मातोश्री म्हणजे माझी आई, असे स्पष्टीकरण दिले आहे.
Join Our WhatsApp Community