भाजप-मनसे युतीबाबत फडणवीसांचे मोठे विधान! काय म्हणाले वाचा…

153

राज्यातील नैसर्गिक पूरासोबतच गेल्या काही दिवसांपासून राजकीय चर्चांना सुद्धा महापूर आला आहे. पालिका निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर मनसे आणि भाजपमध्ये युती होणार, अशी एक शक्यता वर्तवण्यात येत आहे. पण यावर आता देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केले असून, भाजपची भूमिका स्पष्ट केली आहे.

काय म्हणाले फडणवीस?

आमची मनसेशी युतीबाबत कुठलीही चर्चा अजूनपर्यंत झालेली नाही, हे मी स्पष्ट करतो, असे म्हणत फडणवीस यांनी भाजप-मनसे युतीबाबतच्या चर्चांना विराम दिला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना मनसे सोबतच्या युतीबाबत विचारण्यात आले तेव्हा त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. मनसे हा काही आमचा शत्रू पक्ष नाही, परंतु त्यांच्या आणि आमच्या विचारांत तफावत आहे, असे चंद्रकांत दादांनी त्यावेळी सांगितले होते. भाषेच्या आधारावर केला जाणारा भेदभाव भाजपला मान्य नाही. आमची भूमिका ही कायमच हिंदुत्त्ववादी राहिली आहे. अलिकडे मनसेही हिंदुत्त्ववादी होत आहे, त्यामुळे नंतर त्याबाबत विचार केला जाईल, पण अजून तरी अशी कोणतीही चर्चा आमच्यात झालेली नाही, असे फडणवीस म्हणाले. आता त्यांनी मनसे सोबत युतीच्या चर्चांना दिलेला हा विराम पूर्णविराम आहे की अल्पविराम आहे, हे येत्या काळातच समजेल.

(हेही वाचाः भाजपला सापडला नवा भिडू, हिंदुत्वाच्या मुद्द्यावर एकत्र येणार?)

राज ठाकरे दादांना ‘त्या’ लिंक पाठवणार

राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांबाबत सुरुवातीच्या काळात घेतलेली भूमिका यामुळे उत्तर भारतीय मतदार नाराज होण्याच्या भीतीने भाजप मनसे सोबत जाण्यास तयार नाही. जर त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली तर नक्की विचार होऊ शकतो, असे सूचक विधान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. त्यामुळे खुद्द राज ठाकरे यांनीच चंद्रकांत पाटील यांना सांगितलं की त्यांच्या उत्तर भारतीय भाषणांचा विपर्यास झाल्याचे सांगत, त्यांच्या भाषणाच्या लिंक ते चंद्रकांत दादांना पाठवणार असल्याचे त्यांनी सांगितले होते.

म्हणून रंगल्या चर्चा

मागील वर्षी मनसेने आपल्या झेंड्याचा रंग बदलत आपली हिंदुत्वाची भूमिका स्पष्ट केली होती. त्यातच शिवसेनेच्या हिंदुत्वावर सध्या प्रश्नचिन्ह उपस्थित होत असताना, येत्या निवडणुकीत मनसे सोबत प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे हातमिळवणी करण्याचा मानस भाजपचा आहे. ठाणे, नवी मुंबई, नाशिक तसेच मुंबई, यांसारख्या महत्वाच्या पालिका निवडणुकीत हे दोन्ही पक्ष एकमेकांना मदत करतील, अशा चर्चा रंगल्या होत्या.

(हेही वाचाः लोकलसाठी भाजप घेणार रेल्वे इंजिनाची साथ?)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.