नाशिक पदवीधर निवडणुकीत काँग्रेसचे युवा नेते सत्यजित तांबे यांनी अपक्ष अर्ज दाखल करून वेगळाच ट्वीस्ट आणला. मात्र, सत्यजित यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पाच दिवस आधी भाजपाच्या एका बड्या नेत्याने त्यांची गुप्त भेट घेतली होती, अशी माहिती ‘हिंदुस्थान पोस्ट’ला मिळाली आहे. या बैठकीनंतर पडद्यामागे अनेक घडामोडी घडल्या आणि सत्यजित यांनी पक्षनेतृत्त्वाचा निर्णय झुगारून उमेदवारी अर्ज दाखल केला.
( हेही वाचा : शिवसेना नक्की कुणाची; १७ जानेवारीला होणार फैसला)
सत्यजित तांबे कॉंग्रेसकडून पदवीधरसाठी इच्छुक होते. मात्र, त्यांनी पदवीधरऐवजी विधानसभा निवडणूक लढवावी, याकडे राज्यातील नेत्यांसह त्यांचे मामा बाळासाहेब थोरात यांचाही कल होता. त्यांना राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या विरोधात मैदानात उतरविण्याची तयारी कॉंग्रेसने सुरू केली. मात्र, सत्यजित स्वतः विखे यांच्या विरोधात लढण्यास फारसे उत्सुक नव्हते. त्यामुळे त्यांनी नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी आग्रह धरला. परंतु, पक्ष नेतृत्त्वाने त्यांचे वडील सुधीर यांना पसंती दर्शविली. घरातच उमेदवारी दिल्याने बंडखोरी होणार नाही, अशी नेतृत्त्वाला खात्री होती.
मात्र, भाजपाने सत्यजित यांची राजकीय महत्त्वाकांक्षा हेरत योग्य फासे टाकले आणि डाव पलटला. कॉंग्रेसकडून सुधीर तांबे यांनाच उमेदवारी दिली जाईल, याची पूर्वकल्पना भाजपाला होती. त्यामुळे त्यांनी सत्यजित यांना विश्वासात घेत अपक्ष अर्ज दाखल करण्याचा सल्ला दिला. कॉंग्रेसने साथ सोडली, तरी संपूर्ण भाजपा, शिंदे गट आणि राष्ट्रवादीची ताकद पाठिशी उभी करू, असा विश्वास त्यांना देण्यात आला. त्यामुळे त्यांनी होकार दर्शवला. पूत्रप्रेमापुढे सुधीर तांबे यांनाही हार मानावी लागली आणि त्यांनी माघार घेतली.
…असा होता ‘प्लॅन बी’
सुधीर तांबे यांनी माघार घेतली नसती, तर सत्यजित यांच्यापुढे पेच निर्माण झाला असता. त्यामुळे ‘प्लॅन बी’सुद्ध आखण्यात आला होता. वडील सुधीर यांनी कॉंग्रेसची उमेदवारी भरली असती, तर सत्यजित यांना भाजपाची अधिकृत उमेदवारी जाहीर करण्याची योजना होती. आयत्यावेळी गोंधळ होऊ नये, यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी (१२ जानेवारी) निवडणूक अधिकाऱ्यांच्या दालनाबाहेर भाजपाचा एक संघटनमंत्री सत्यजित तांबे यांच्यासाठी एबी फॉर्म घेऊन उभा होता, अशी माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली.
Join Our WhatsApp Community