महाविकास आघाडी गाजराची पुंगी, सत्ता जाताच झाली बिघाडी – केशव उपाध्ये

175

सत्तेची संधी दिसल्यामुळे एकत्र आलेल्या शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची महाविकास आघाडी ही केवळ गाजराची पुंगी होती हे आता स्पष्ट झाले आहे. सत्ता जाताच या आघाडीची बिघाडी झाली असून एकत्र राहिल्यास तीन तिघाडा काम बिघाडा होईल याची त्यांना खात्री असल्यामुळेच विधान परिषदेच्या निवडणुकीत तिघांची तोंडे तीन दिशांना असल्याचे दिसू लागले आहे. महाविकास आघाडी म्हणून सत्ता राबवितानाही एकमेकांवर कुरघोडी करणाऱ्या नेत्यांना आता आपापल्या पक्षाचा बचाव कसा करायचा या चिंतेने ग्रासले असून ही आघाडी म्हणजे महाराष्ट्राला लागलेले ग्रहण होते, अशी खरमरीत टीका प्रदेश भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी शुक्रवारी केली. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी प्रदेश प्रवक्ते गणेश हाके, शिवानंद हैबतपुरे उपस्थित होते.

काँग्रेसची अवस्था झाली केविलवाणी

भाजपा प्रदेश मुख्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले की, ‘सत्ता गेल्यानंतरही एकत्र राहण्याच्या गर्जना करणारे महाविकास आघाडीतील तीन पक्ष विधान परिषदेच्या पाच जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीतही एकत्र राहू शकत नाहीत, यावरूनच त्यांच्या ऐक्याच्या गर्जना केवळ पोकळ होत्या हे उघड झाले आहे. बंडखोरी, नाराजी आणि फुटीने ग्रासलेल्या काँग्रेसकडे उमेदवार नाहीत. पक्षातील नाराजीमुळे काँग्रेसची अवस्था केविलवाणी झाली आहे. तर, राष्ट्रवादीला भ्रष्टाचाराने ग्रासले आहे.’

मविआने स्वतःच आपल्या तिघाडीचा गाशा गुंडाळला 

‘उद्धव ठाकरे यांची शिल्लक सेना महाविकास आघाडीत एकाकी झाली असून काँग्रेस-राष्ट्रवादीकडून या पक्षाच्या अस्तित्वाची दखलही घेतली जात नसल्याने ठाकरे गटाची अवस्था केविलवाणी झाली आहे. अशा तिघाडी स्थितीतील ही आघाडी पाच जागांकरितादेखील उमेदवार देऊ शकत नसल्याने आघाडीचे अस्तित्व संपले आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीकडेचे उमेदवारच नाही. तर, अमरावती पदवीधर मतदारसंघातून लढण्याआधीच काँग्रेसने माघार घेतली आहे. नागपूरमध्ये तीनही पक्षांचे उमेदवार उभे करून महाविकास आघाडीने स्वतःच आपल्या तिघाडीचा गाशा गुंडाळला आहे’, असे उपाध्ये म्हणाले. ‘महाविकास आघाडी ही राजकीय तडजोड म्हणून जन्माला आलेली आणि उद्धव ठाकरेंच्या विश्वासघातकी महत्वाकांक्षेस खतपाणी घालून शिवसेनेची शकले करण्यासाठी आयोजित केलेली शक्कल होती हे आता स्पष्ट झाल्याने या आघाडीचे अस्तित्व संपले आहे,’ असे उपाध्ये यांनी सांगितले.

(हेही वाचा – रुपाली चाकणकरांना उर्फीचा नंगानाच मान्य आहे का? चित्रा वाघ यांचा सवाल)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.