सोमय्यांना केले स्थानबद्ध? फडणवीसांसह भाजपा नेत्यांनी केला सरकारचा निषेध

सोमय्या यांना स्थानबद्ध केल्याची माहिती मिळाल्यानंतर भाजपा नेत्यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे.

भाजपा नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या गेले अनेक दिवस राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांवर आरोपांच्या तोफा डागत आहेत. सोमय्या यांनी घोटाळेखोर नेत्यांच्या तयार केलेल्या यादीत अनेकांची नावे आहेत. असे असताना आता किरीट सोमय्या यांना स्थानबद्ध करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. याचा निषेध म्हणून भाजपा नेत्यांनी राज्य सरकारवर टीका करत सोमय्या यांना पाठिंबा दिला आहे.

फडणवीसांनी केला निषेध

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट करत सोमय्यांवरील कारवाईचा निषेध केला आहे. किरीट सोमय्या यांना स्थानबद्ध करण्याची कारवाई पूर्णपणे बेकायदेशीर असून त्याचा आम्ही निषेध करतो, राज्य सरकारविरुद्ध आमचा संघर्ष सुरुच राहील, असे ट्वीट देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.

किरीटजी लगे रहो, इनकी बजाते रहो

राज्य सरकारने किरीट सोमय्या यांना स्थानबद्ध केले असेल, तर याचाच अर्थ सोमय्या यांनी दिलेली माहिती अगदी योग्य आहे. त्यांनी जे काही सांगितले त्यात सत्य आणि तथ्य आहे. किरीटजी आम्ही तुमच्यासोबत आहोत. लगे रहो… और इनकी बजाते रहो, अशा शब्दांत भाजपा आमदार नितेश राणे यांनी ठाकरे सरकारवर जोरदार घणाघात केला आहे.

ठाकरे सरकारची दादागिरी- सोमय्या

किरीट सोमय्या यांनीही ट्वीट करत ठाकरे सरकारवर टीका केली आहे. ठाकरे सरकारची दादगिरी आणि दडपशाही सुरू आहे. माझ्या घराखाली पोलिसांची गर्दी असून, माझा कोल्हापूर दौरा थांबवण्यासाठी आणि हसन मुश्रीफ घोटाळा दाबण्यासाठी मला घरातून अटक करण्याचे आदेश गृहमंत्र्यांकडून देण्यात आले आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात प्रवेश करण्यास मला बंदी घालण्यात आली आहे. तसेच मला स्थानबद्ध करण्यात आले असून, मुलुंड पोलिस मला अटक करण्यासाठी आले आहेत. पण त्यांच्याकडे अटकेसाठी कुठलेही वॉरंट किंवा आदेश नाही. त्यामुळे ही कारवाई संपूर्णपणे बेकायदेशीर असल्याचे सोमय्या यांनी म्हटले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here