भाजपा खासदार किरीट सोमय्यांना पोलिसांकडून स्थानबद्ध करण्यात आल्यानंतर ही कारवाई बेकायदेशीर असल्याचा आरोप सोमय्या आणि भाजपा नेत्यांनी ठाकरे सरकारवर केला होता. त्यामुळे यासंदर्भात किरीट सोमय्या यांनी मुलुंड पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. ठाकरे सरकारने केलेली ही कारवाई राजकीय सूडबुद्धीने करण्यात आल्याचे सांगतानाच त्यांनी ठाकरे सरकार हे माफियांचे सरकार असल्याचा आरोप हिंदुस्थान पोस्टला प्रतिक्रिया देताना केला आहे.
काय म्हणाले सोमय्या?
मुंबई पोलिसांनी राज्याचे गृहमंत्री दिलीप-वळसे पाटील यांच्या बेकायदेशीर आदेशाचे पालन करत मला 20 सप्टेंबर रोजी माझ्या घरात कोंडून ठेवले. मला कोल्हापूरची ट्रेन मिळू नये यासाठी पोलिसांकडून हा प्रयत्न करण्यात आला. त्यामुळे माझ्या वकिलांनी पोलिसांना नोटीस दिली आहे, असे किरीट सोमय्या यांनी सांगितले.
(हेही वाचाः संजय राऊत यांनी खरंच राजकारण सोडावं, ‘या’ नेत्याचा सल्ला)
ठाकरे सरकारची दादागिरी
कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयातून आलेल्या आदेशाची प्रत मला पोलिसांनी दाखवली. त्यात कोल्हापूर जिल्ह्यात प्रवेश केला, तर माझ्यावर कारवाई होईल, असे स्पष्टपणे म्हणण्यात आले आहे. त्यामुळे एकप्रकारे ही ठाकरे सरकारची उद्धटशाही आणि दादागिरी आहे. घोटाळेबाजांना मोकाट फिरण्याची संधी, पण घोटाळे बाहेर काढणा-यांना अटक करणं, ही ठाकरेशाही असल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे.
सत्तेची माफियागिरी
हा सत्तेचा गैरवापर नसून, ही सत्तेची माफियागिरी आहे. लूट करायची आणि यांच्याविरोधात कोणी बोलले की त्यांच्यावर कारवाई करायची, त्यांना घराच्या बाहेर पडू द्यायचे नाही, अशी माफियागिरी सुरू असून ठाकरे सरकार हे माफियांचे सरकार असल्याचा झणझणीत आरोपही सोमय्या यांनी केला आहे.
(हेही वाचाः मुख्यमंत्र्यांनी हिरवा रंग धारण केला! किरीट सोमय्यांचा आरोप)
गृहमंत्र्यांना माफी मागावीच लागेल
माझ्यावर अब्रुनुकसानीचा दावा केला तरी मी घाबरणार नाही. घोटाळेबाजांना शिक्षा ही होणारच आहे. मी मानवाधिकार आयोगाकडे तक्रार दाखल करणार असून, राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांना माफी मागावीच लागेल, असेही किरीट सोमय्या यांनी सांगितले.
Join Our WhatsApp Community