नवलानी प्रकरणाचं काय झालं? सरकारचा तपास कुठंवर आलाय? सोमय्यांचा सरकारला सवाल

भाजप नेते किरीट सोमय्या आणि राज्याचे विद्यमान ठाकरे सरकार यांच्यात सतत खटके उडत असतात. आता पुन्हा एकदा किरीट सोमय्या यांनी राज्य सरकारला प्रश्न विचारला आहे. जितेंद्र नवलानी प्रकरणाचा तपास कुठंवर आलाय, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. ट्वीट करत सोमय्या यांनी नवलानी प्रकरणावर सरकारचा समाचार घेतला आहे.

ट्वीट करत केला सरकारला सवाल

किरीट सोमय्या यांनी ट्वीट करत, महाविकास आघाडी सरकारवर जितेंद्र नवलानी प्रकरणाच्या मुद्द्यावरुन टीका केली आहे. जितेंद्र नवलानी प्रकरणाचा तपास मुंबई पोलीस आर्थिक गुन्हे शाखा करत आहे की एसीबी मुंबई करत आहे, असे विचारताना सोमय्यांनी आर्थिक गुन्हे शाखा विभागाच्या चौकशी पथकाचे काय झाले, असा सवालही केला आहे. एसीबीने प्राथमिक चौकशी किती दिवसांत पूर्ण केली, असा प्रश्नही सोमय्यांनी केला.

( हेही वाचा: LPG Price Hike: सर्वसामान्यांना मोठा धक्का; गॅस सिलेंडरच्या दरांत मोठी वाढ )

हे आहे प्रकरण

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत, जितेंद्र नवलानीविरोधात खंडणी वसूलीचे आरोप केले होते. नवलानीने उद्योजक, व्यावसायिकांना ईडीची धमकी देऊन वसुली केली असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणातील एक तक्रार नोंदवून तपास सुरु केला. जितेंद्र नवलानी विरोधात महाराष्ट्र लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लूक आउट नोटीस जारी केली आहे.

 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here