ठाकरे सरकारची डोकेदुखी आता राणे वाढवणार? कोणता भ्रष्टाचार उघड करणार?

सगळ्या खात्यांमधला भ्रष्टाचार आपण पुराव्यानिशी उघड करणार असल्याचे नारायण राणे म्हणाले.

135

माजी मुख्यमंत्री नारायण राणे आणि शिवसेनेमधील वाद काही नवा नाही. त्यातच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सरकार राज्यात आल्यानंतर भाजपचे राज्यसभा खासदार असलेले राणे चांगलेच आक्रमक झाले असून, आता तर राणेंनी ठाकरे सरकारवर गंभीर आरोप केला आहे. महाराष्ट्राचे शोषण करणारे हे सरकार असून, कोरोना औषधासाठी काढलेल्या टेंडरमध्येही या सरकारने भ्रष्टाचार केला असल्याचा गंभीर आरोप नारायण राणे यांनी केला आहे. आपण लवकरच या सरकारचा भ्रष्टाचार उघड करणार असल्याचंही त्यांनी सांगितले आहे.

काय म्हणाले नेमकं राणे?

सध्याचे सरकार हे महाराष्ट्राचे शोषण करणारे सरकार असून, त्यांच्या सगळ्या खात्यांमधला भ्रष्टाचार आपण पुराव्यानिशी उघड करणार असल्याचे नारायण राणे म्हणाले. त्याचबरोबर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदाच्या लायकीचे नसल्याचेही ते म्हणाले. या सरकारने कोरोना औषधांसाठी काढलेल्या टेंडरमध्येही भ्रष्टाचार केला आहे. लसींचं टेंडर का रद्द केले? राऊतांनी याचे उत्तर द्यावे, असेही ते यावेळी म्हणाले. संजय राऊत प्रत्येक वेळी केंद्रावर, मोदींवर बोट ठेवतात. मग सरकारने सरळ केंद्रातच विलीन व्हावे, असेही ते म्हणाले. सरकारने लोकांना वाचवण्यासाठी आत्तापर्यंत काहीही केले नाही. ना लसी आहेत, ना व्हेंटिलेटर्स आहेत, काहीच नाही. अशा शब्दांत त्यांनी सरकारच्या कारभारावर ताशेरे ओढले आहेत.

(हेही वाचाः ‘तौक्ते’नंतर आता राणेंच्या ट्विटने ‘वादळ’!)

कोकण दौऱ्यावरही टीका

कोकणाच्या विकासासाठी मुख्यमंत्र्यांनी काय दिले? मुख्यमंत्र्यांनी दोन दिवसांत पॅकेज का जाहीर केले नाही? असा सवाल करत नारायण राणे यांच्याकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कोकण दौऱ्यावर प्रश्न उपस्थित करण्यात आले. मुख्यमंत्र्यांचा कोकण दौरा म्हणजे नुसता फेरफटका आणि ‘नौटंकी’ दौरा असल्याचे नारायण राणे म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी कोकणचा दौरा केला, पण त्यासाठी किती वेळ दिला? असा सवाल त्यांनी केला आहे. केवळ तीन तासांच्या दौऱ्यात मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. पण या वादळात किती लोकांचे नुकसान झाले, किती जणांचे रोजगार गेले याची माहिती लोकांकडून घेतली नाही. मुख्यमंत्र्यानी लोकांची का भेट घेतली नाही?, असा सवाल करत त्यांच्या आश्वासनामध्ये स्पष्टता नाही अशी टीका नारायण राणे यांनी केली. मुख्यमंत्र्यांनी कोकणाला काय दिलं, एक तरी प्रकल्प दिला का? पर्यटनासाठी काय दिले, किती विकास केला हे सांगावे. भावनिक विषयावर गोड-गोड बोलून कोकणची फसवणूक केली जात आहे, अशी टीका देखील त्यांनी यावेळी केली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.