राणेंच्या घरातही कोरोना, निलेश राणेंना कोरोनाची लागण

राज्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत असतानाच आता भाजपा नेते आणि माजी खासदार निलेश राणे यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. निलेश राणे यांनी स्वत: ट्विट करून ही माहिती दिली. कोरोनाची प्राथमिक लक्षणे दिसल्याने चाचणी केली असता माझा कोविड-19 रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. माझी तब्ब्येत उत्तम असून, डॉक्टरांच्या सल्ल्याने मी स्वतःला सेल्फ क्वारंटाईन करुन घेतले आहे. गेल्या काही दिवसात माझ्या संपर्कात आलेल्या सर्व व्यक्तींनी स्वत:ची चाचणी करावी”, असे ट्विट त्यांनी केले.

निलेश राणे यांनी चार दिवसांपूर्वी सिंधुदुर्गमध्ये कोरोना चाचणी केली होती. मात्र, तेव्हा ती निगेटिव्ह आली होती. काल रात्री त्यांनी पुन्हा मुंबईमध्ये चाचणी केली. त्याचा अहवाल आज पॉझिटिव्ह आला. मात्र, आपली प्रकृती ऊत्तम असल्याचे त्यांनी सांगितले.

बाळासाहेब पाटील यांनाही कोरोना

ठाकरे सरकारमधील आणखी एका कॅबिनेट मंत्र्याला कोरोनाची लागण झाली आहे. सहकार आणि पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आली आहे. बाळासाहेब पाटील यांना कोरोनाची काही लक्षणे दिसून येत होती. त्यामुळे त्यांनी स्वत:हून अँटीजेन टेस्टसह आरटीपीसीआर चाचणी केली होती. हा चाचणी अहवाल शुक्रवारी मध्यरात्री पॉझिटिव्ह आला. बाळासाहेब उर्फ शामराव पांडूरंग पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते आहेत. पाटील यांच्याकडे साताऱ्याच्या पालकमंत्रीपदाचीही धुरा आहे. बाळासाहेब पाटील हे 1999 पासून कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत.

नवनीत राणा लिलावतीमध्ये

दरम्यान, खासदार नवनीत राणा यांच्यासह त्यांचे पती आमदार रवी राणा आणि दोन्ही मुले, सासू-सासऱ्यांसह कुटुंबातील १२ जणांना करोनाची लागण झाली असून, श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने नवनीत राणा यांना लिलावती रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. मात्र आता त्यांची प्रकृती स्थिर असून, त्यांनी व्हिडिओद्वारे ही माहिती दिली.

आज मला ICU मधून सामान्य कक्षात स्थलांतर करण्यात आले आहे, आता माझी प्रकृति थोड़ी स्थिर आहे, आपण सर्वांचा आशीर्वाद माझ्या सोबत आहे, मी लवकर बरी होऊन जनसेवेत पुन्हा सज्ज होणार…

Posted by Navneet Ravi Rana on Saturday, August 15, 2020

“लीलावती रुग्णालयाच्या आयसीयूमधून आज मला सामान्य कक्षात स्थलांतर करण्यात आले आहे, आता माझी प्रकृती थोडी स्थिर आहे. आपल्या प्रार्थनांमुळे मी मृत्यूच्या दाढेतून बाहेर आले. आपणा सर्वांचा आशीर्वाद माझ्यासोबत आहे. गेले पाच-सहा दिवस मी अमरावती-नागपूर-मुंबई असा प्रवास केला. आपण चिंता करु नका. माझी लहान मुलंसुद्धा काळजी करत आहेत, त्यांनाही मी हा व्हिडीओ पाठवत आहे. मी आणखी चांगली कामं करावी म्हणून देवाने मला पुन्हा संधी दिली. मी लवकर बरी होऊन जनसेवेत पुन्हा सज्ज होणार” अशी माहिती नवनीत राणा यांनी दिली.

महाविकास आघाडीतील या मंत्र्याना कोरोना 

दरम्यान आतापर्यंत महाविकास आघाडीतील सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, उदगीर मतदासंघाचे आमदार आणि राज्याचे पाणीपुरवठा राज्यमंत्री संजय बनसोडे यांना कोरोनाची लागण झाली होती. मात्र या सर्व मंत्र्यांनी कोरोनावर मात केली आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here