राज्यातील देशद्रोही मंत्री नवाब मलिक यांच्याविरोधात भारतीय जनता पक्षाने रणशिंग फुंकले आहे. त्यांच्या राजीनाम्यासाठी पक्ष आंदोलन उभारणार आहे, अशी घोषणा पक्षाचे प्रदेश चिटणीस निलेश राणे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केली.
यावेळी त्यांनी दाऊदच्या गुलामाचे गुलाम होण्याऐवजी जनतेच्या मनातील नवाब व्हा, असे म्हणत ठाकरे सरकारवर निशाणा साधला. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष दीपक पटवर्धन, मुन्ना चवंडे, सचिन करमकर, उमेश कुळकर्णी आदी उपस्थित होते.
मलिकची हकालपट्टी करा
महाराष्ट्रातील ठाकरे सरकारमध्ये नवाबाचा मुखवटा घेऊन वावरणारा मलिक नावाचा मंत्री प्रत्यक्षात कुख्यात आंतरराष्ट्रीय दहशतवादी आणि देशद्रोही दाऊद इब्राहीमचा गुलाम असल्याचे ईडीच्या आरोपपत्रांतून स्पष्ट होत आहे. तरीही ठाकरे सरकार त्या मंत्र्याच्या सरबराईसाठी जीव तोडून सज्ज झाले आहे. देशद्रोही दाऊदच्या हस्तकाची पाठराखण करणारे ठाकरे सरकार महाराष्ट्राच्या जनतेच्या जिवाशी खेळत असून, दाऊदच्या हातचे बाहुले झाले आहे. सत्तेच्या सुरक्षेसाठी जनतेच्या सुरक्षेला मूठमाती देण्याचा खेळ ठाकरे सरकारने ताबडतोब थांबवावा आणि दाऊदचा हस्तक नवाब मलिकची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करून महाराष्ट्र वाचवावा, असे निलेश राणे म्हणाले.
काळा पैसा गोळा करण्याचे षडयंत्र
शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा नेता म्हणून मिरवणाऱ्या नवाब मलिक याचा खरा चेहरा आता ईडीच्या कारवाईनंतर समोर येऊ लागला असून, तपासानंतर आणखीही अनेक कारवाया उजेडात येण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रासह संपूर्ण देश अस्थिर करण्यासाठीच दाऊद इब्राहीमने बॉम्बस्फोट घडवले होते. या कटाच्या अंमलबजावणीसाठी स्थानिक पातळीवर पैसा उभा करण्याच्या योजनेचाच एक भाग म्हणून बेनामी मालमत्ता मातीमोल भावाने विकत घेऊन, मोठ्या प्रमाणावर काळा पैसा गोळा करण्याचे षडयंत्र आता उघडकीस येऊ लागले आहे, असा आरोप राणेंनी केला आहे.
दबावापुढे झुकून दाऊदच्या हस्तकाला संरक्षण
नवाब मलिकने केलेला व्यवहार हा त्या षडयंत्राचाच एक भाग होता, हे ईडीच्या आरोपावरून स्पष्ट होते. असे असतानाही नवाब मलिक यांचे मंत्रीपद वाचवण्यासाठी खुद्द शरद पवारच ठाकरे सरकारवर दबाव आणत असून, मुख्यमंत्रीपद वाचवण्यासाठी उद्धव ठाकरे या दबावापुढे झुकून दाऊदच्या या हस्तकाला संरक्षण देत आहेत. संपूर्ण ठाकरे सरकारच दाऊदचे गुलाम झाले आहे काय, असा सवालही निलेश राणे यांनी केला.
( हेही वाचा: दाऊदच्या गुलामाचे गुलाम होण्याएवजी जनतेच्या मनातील नवाब व्हा )
महाराष्ट्राचा अपमान
महाराष्ट्राच्या आणि देशाच्या सुरक्षिततेस धोका ठरणाऱ्या नवाब मलिक यांची केवळ मंत्रिमंडळातून हकालपट्टी करणे पुरेसे नाही, तर या कामी ईडीकडून केल्या जाणाऱ्या तपासातही ठाकरे सरकारने संपूर्ण सहकार्य केले पाहिजे, अशी मागणीही राणे यांनी केली. नवाब मलिक यांना वाचवण्यासाठी आणि सत्ता टिकवण्यासाठी आपण महाराष्ट्राचा अपमान करत आहोत, याची ठाकरे सरकारला जाणीव नसावी हे दुर्दैवी आहे.
महाराष्ट्र गय करणार नाही
आघाडी सरकारच्या या लाळघोटेपणामुळेच महाराष्ट्राची नामुष्की होत असून, मुख्यमंत्री ठाकरे यांच्याप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्र कणाहीन नाही, हे दाखवण्यासाठी भाजपतर्फे तीव्र आंदोलन पुकारले गेले आहे. नवाब मलिक यांची हकालपट्टी आणि कठोर कारवाई करून दहशतवादास हातभार लावणाऱ्या देशद्रोह्याच्या पाठीराख्यांची महाराष्ट्र गय करणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
Join Our WhatsApp Community