वैभव नाईकांना ‘शिवप्रसाद’ दिलाय, ‘सामना’त येऊन देतो! नितेश राणेंचा इशारा 

शिवसेनेच्या वर्धापनदिनानिमित्त वैभव नाईक यांनी भाजपला डिवचण्यासाठी येथील एका पेट्रोल पंपावर स्वस्तात पेट्रोल वाटप सुरु केले होते.

143

शिवसेनेच्या वर्धापनदिनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवसैनिक आणि भाजप कार्यकर्ते यांच्यात राडा झाला. त्यानंतर भाजप खासदार नारायण राणे यांची दोन्ही सुपुत्र आक्रमक बनले आहेत. भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी थेट शिवसेना नेते संजय राऊतांना आव्हान दिले आहे. या राड्यानंतर नितेश राणे यांनी ट्विट करत ‘शिवप्रसाद’ काय असतो, ते संजय राऊतांनी आमदार वैभव नाईक यांना विचारावे. आमच्या कार्यकर्त्यांनी त्यांना पोटभर ‘प्रसाद’ दिला आहे. पाहिजे असेल तर तुमच्यासाठी मी सामना ऑफिसमध्ये पार्सल घेऊन येतो. टेस्ट आवडेल नक्की, असे नितेश राणे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

दोन दिवसांपूर्वी मुंबईत भाजपच्या कार्यकर्त्यांनी शिवसेना भवनासमोर आंदोलन केले होते. श्री राम मंदिर ट्रस्टवर जमीन घोटाळ्याचा आरोप झाला आहे. त्याअनुषंगाने शिवसेनेने जाब विचारल्यावर भाजपने शिवसेना भवनासमोर येऊन आंदोलन केले. त्यावेळी शिवसैनिक आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली होती. त्यानंतर शिवसेना नेते संजय राऊत यांनी, भाजपच्या कार्यकर्त्यांना ‘शिवप्रसाद’ दिला आहे, ‘शिवभोजन’ थाळी देण्याची वेळ आणू देऊ नका’, असे म्हटले होते.

(हेही वाचा : आता नितेश राणेंकडून ‘त्या’ भाजप कार्यकर्त्यांचा सत्कार!)

नेमके काय घडले?

शिवसेनेच्या वर्धापनदिनानिमित्त वैभव नाईक यांनी भाजपला डिवचण्यासाठी येथील एका पेट्रोल पंपावर स्वस्तात पेट्रोल वाटप सुरु केले होते. मात्र, हा पेट्रोलपंप नेमका नारायण राणे यांच्या मालकीचा निघाला. वैभव नाईक आणि शिवसेनेचे कार्यकर्ते पेट्रोल पंपावर नागरिकांना पेट्रोल खरेदी करण्यासाठी पैसे वाटत होते. त्यावेळी भाजपचे कार्यकर्ते त्याठिकाणी आले आणि त्यांनी आक्षेप घेतला. तेव्हा दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांनी घोषणबाजी सुरु केली आणि एकमेकांच्या अंगावर धावून गेले. विशेष म्हणजे आमदार वैभव नाईक यांनीही या हाणामारीत भाग घेण्याचा प्रयत्न केला. ते भाजप कार्यकर्त्यांच्या अंगावर धावूनही गेले होते. मात्र, पोलिसांनी हस्तक्षेप केल्यामुळे पुढील अनर्थ टळला. यानंतर वैभव नाईक आणि शिवसेनेचे कार्यकर्ते दुसऱ्या पेट्रोल पंपावर निघून गेले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.