गाढवांचा भार उचलायला, बैलांचा नकार! प्रसाद लाडांची काँग्रेस आंदोलनावर टीका

इंधन दरवाढी विरोधात काँग्रेसने बैलगाडीवरून मोर्चा काढला, मात्र एकाच वेळी या बैलगाडीवर अनेक कार्यकर्ते उभे होते. त्यामुळे बैलगाडी तुटली.

इंधन दरवाढीवरून काँग्रेस पक्ष सध्या राज्यातील विविध ठिकाणी आंदोलन करत आहे. मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप यांच्या नेतृत्वात शनिवार, १० जुलै रोजी मुंबईत आंदोलन झाले. त्यावेळी पेट्रोल, डिझेलच्या निषेधार्थ बैलगाडीवरून मोर्चा काढण्यात आला. मात्र आंदोलनादरम्यान बैलगाडी तुटली व काँग्रेस कार्यकर्त्यांसह भाई जगतापही खाली पडले. सध्या त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून भाजप प्रदेश उपाध्यक्ष, आमदार प्रसाद लाड यांनी ट्वीट करत खोचक टोला हाणला आहे.

(हेही वाचा : काँग्रेसचे महागाईविरुद्ध आंदोलन, नेते पडले बैलगाडीवरून !)

प्रसाद लाड यांचे ट्विट!

“गाढवांचा’ भार उचलायला, ‘बैलांचा नकार! भाई जगताप तुम्हाला सांगू इच्छितो की, “माणसाने झेपेल तेवढंच करावं! असे पब्लिसिटी स्टंट करताना, त्या मुक्या जीवांचा विचार करावा!” अशी टीका आमदार प्रसाद लाड यांनी केली आहे. अशा प्रकारचे स्टंट करून आणि मुक्या जनावरांना इजा पोहचवून काँग्रेसला काय साध्य करायचं आहे? असा सवाल देखील प्रसाद लाड यांनी केला आहे.

काँग्रेसचे आंदोलन बनले टीकेचा विषय!

दरम्यान, इंधन दरवाढी विरोधात काँग्रेसचा मोर्चा आयोजित करण्यात आला होता. मात्र एकाच वेळी या बैलगाडीवर अनेक कार्यकर्ते उभे होते. काही वेळातच बैलगाडीचा हा भाग वेगळा होऊन तुटला आणि उभे कार्यकर्ते खाली पडले. या सगळ्या प्रकारामुळे काँग्रेसच्या या आंदोलनावर टीका-टिप्पणी केल्या जात आहेत.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here