राज ठाकरेंवर गुन्हा दाखल होताच भाजप उतरली मैदानात!

199

औरंगाबादमध्ये राज ठाकरेंवर गुन्हा दाखल करण्यात आला असून मंगळवारी राज ठाकरेंवर कलम ११६, ११७, मुंबई पोलीस कायदा अधिनियम १३५ आणि १५३ अ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राज ठाकरे यांच्या जाहीर सभेला चांगला प्रतिसाद मिळत असल्याने ठाकरे सरकारचा जळफळाट झाला आहे. आता तोच राग ठाकरे सरकार बाहेर काढत आहे. त्यामुळेच पोलिसांनी राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल केल्याची टीका प्रवीण दरेकर यांनी केली आहे.

(हेही वाचा – … तर मनसैनिक रस्त्यावर उतरतील, सरकारने तयार रहावे; मनसेचा इशारा)

राज ठाकरेंचे समर्थन करत राज्य सरकारवर टीकास्त्र

मंगळवारी मुंबईत प्रसार माध्यमांशी बोलताना प्रवीण दरेकर म्हणाले, राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल करून सरकार मनसैनिकांना संदेश देऊ पाहत आहे. आमच्याविरोधात बोललात तर कायद्याचा वापर करून तुम्हाला पूर्णपणे दाबू, असे सरकार सुचवू पाहत आहे, असा आरोपदेखील प्रवीण दरेकरांनी केला आहे. यावेळी प्रवीण दरेकर यांनी राज ठाकरे यांचे समर्थन करत ठाकरे सरकारवर टीकास्त्र सोडल्याने आता भाजप देखील राज ठाकरेंवर गुन्हा दाखल होताच मैदानात उतरल्याचे म्हटले जात आहे.

काय म्हणाले प्रवीण दरेकर?

सरकारने एखादे आंदोलन चिरडायचे ठरवले तर काय होऊ शकते, याचे एक उदाहरण म्हणून मी मनसेकडे पाहत आहे. रस्त्यावर उतरून आंदोलन करू शकतील. अशा मनसेच्या नेत्यांना अटक केले जात आहे. तुमच्या पक्षाच्या प्रमुखांवर गुन्हा दाखल होऊ शकतो, या प्रकरणावरून बाकीच्यांनी बोध घेण्यासारखे आहे. हे सरकारकडून अधोरेखित करण्याचा प्रयत्न होत आहे. मनसेचे मशिदींवरील भोंग्यांबाबतचे आंदोलन चिरडण्यासाठी दबाव आणण्याचे सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत, असेही दरेकर म्हणाले. तसेच पुढे दरेकर असेही म्हणाले की, ठाकरे सरकारला शांतता नको आहे. धरपकड, नोटीस किंवा अटक करून हिटलरशाही पद्धतीने शांतता राखता येईल, असा ठाकरे सरकारचा समज आहे का? पण राज्य सरकार हिंदुत्वाची चळवळ जितकी दडपण्याचा प्रयत्न करण्यात येईल, तितकी ती उसळी मारून वर येईल.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.