विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर निवडणूक मतदारसंघासाठी मतदान प्रक्रियेला सोमवार सकाळपासून सुरुवात झाली आहे. या निवडणुकीत अधिक चर्चेत राहिलेला नाशिक पदवीधर मतदारसंघात अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे आणि शुभांगी पाटील यांच्या मुख्य लढत आहे. शुभांगी पाटील यांना महाविकास आघाडीने पाठिंबा दर्शविला आहे. तरी देखील मविआचे नेते प्रत्यक्षात शुभांगी पाटील यांच्यासाठी काम करताना दिसत नसल्याचे बोलले जात आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप नेते आणि महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मविआवर निशाणा साधला आहे. घरोबा एका बरोबर करायचा आणि संसार दुसऱ्याबरोबर करायचा अशी अवस्था मविआची असल्याचे विखे-पाटील म्हणाले.
प्रसारमाध्यमांशी बोलताना राधाकृष्ण विखे-पाटील म्हणाले की, ‘राज्यातील जी महाविकास आघाडी आहे, ती एक टोळी आहे. ही कोणत्या विचारसरणीवर, विचारधारेवर किंवा तत्वांवर आधारित एकत्र आली नव्हती. घरोबा एका बरोबर करायचा आणि संसार दुसऱ्याबरोबर करायचा ही मविआची अवस्था आहे.’
पुढे विखे पाटील म्हणाले की, ‘शिवसेनेने भाजपचा आधार घेऊन निवडणूक लढवायची आणि दुसऱ्या बरोबर हात मिळवणी करायची. त्यामुळे शिवसेनेत कोणी टिकल नाही. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर तर ठाकरे सेनेने पूर्ण फारकत घेतल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. कोणताही आदर्श नसणारी ही मंडळी आहेत. काँग्रेसमध्ये तर पक्षाचा उमेदवार अधिकृत राहिला नाही. काँग्रेसचे सो कॉल्ड नेते घरात बसले आहेत. पक्ष त्यांच्यावर कारवाई करायला तयार नाहीये.’
(हेही वाचा – Amravati Graduate Constituency: ऐन निवडणुकीच्या धामधुमीत रवी राणांमुळे भाजप उमेदवार अडचणीत)
Join Our WhatsApp Community