हिंदुहृदयसम्राट आणि शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्ताने माटुंग्यातील षण्मुखानंद सभागृहात सोमवारी, उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना संबोधित केलं. यावेळी त्यांनी शिंदे गटासह भाजपवर जोरदार निशाणा साधला. याच पार्श्वभूमीवरून कॅबिनेट मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. सत्ता गेल्याने ठाकरेंची चिडचिड होतेय, माजी मुख्यमंत्र्यांचा टोमणे मारणं हाच पराक्रम, असं मुनगंटीवार म्हणाले.
प्रसारमाध्यमांसोबत बोलताना सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, ‘सत्ता गेल्यानंतर त्यांच्या मनामध्ये जी खदखद आहे, ती अशा शब्दाचा उपयोग करून चिडचिड व्यक्त करण्यामध्ये घालवत आहेत. सत्ता गेल्यानंतर त्यांचं एकही भाष्य किंवा भाषण नाही की, ज्यामध्ये त्यांनी सव्वा-दोन वर्षामध्ये राज्याच्या जनतेच्या सेवेसाठी कोणते निर्णय घेतले, असा एकही निर्णय त्यांना सांगता येत नाही. देवेंद्र फडणवीस जसे म्हणतात की, त्यांच्याकडे टोमणे बॉम्ब खूप आहे. टोमणे मारणं हाच माजी मुख्यमंत्र्यांचा पराक्रम आहे.’
उद्धव ठाकरे काय म्हणाले होते?
सोमवारी शिवसैनिकांना संबोधित करताना उद्धव ठाकरे म्हणाले की, ‘भाजपाकडे कोणी आदर्श नसल्यामुळे, वारसा हडपण्याचा त्यांच्या डाव सुरू आहे. सरदार वल्लभभाई पटेल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, बाळासाहेब ठाकरे हे आपलेच असल्याच मतलबी दावा भाजप करीत आहे. हिंमत असेल तर आगामी निवडणुकीत भाजपनं मोदींच्या नावानं मत मागून उतरावं आणि मी वडील बाळासाहेबांच्या नावानं उतरून मत मागीन. मग बघा महाराष्ट्र कोणाच्या बाजूनं उभा राहतोय, हे एकदा आमने-सामने होऊन जाऊ दे.’ (हेही वाचा – सावरकरांबाबत अतिशय नीच शब्दांत बोलणाऱ्या राहुल गांधींनी राजीनामा द्यावा; मुनगंटीवारांकडून विरोधकांना प्रत्युत्तर)
Join Our WhatsApp Community