पावसाने मुंबईला झोडलं, भाजपने शिवसेनेला झोडलं

विरोधक चांगलेच आक्रमक झाले असून, भाजप नेत्यांनी तर शिवसेनेलाच टार्गेट केले आहे.

128

मुंबईत काल रात्रीपासून पडणाऱ्या पावसाने मुंबईची पुन्हा एकदा तुंबई झाली आहे. मुंबईत ठिकठिकाणी पाणी साचल्याने मुंबई महापालिका प्रशासनाने नालाईसफाईचा केलेला दावा फोल ठरला आहे. त्यामुळे मुंबईकरांनी प्रशासनाविरुद्ध आपला संताप व्यक्त केला आहे. यावरुन आता विरोधक चांगलेच आक्रमक झाले असून, भाजप नेत्यांनी तर शिवसेनेलाच टार्गेट केले आहे.

राणे बंधुंचा शिवसेनेवर प्रहार

शिवसेना आणि राणे परिवार यांच्यातील वाद सर्वांनाच माहीत आहे. शिवसेनेवर टीका करण्याची एकही संधी राणे सोडत नाहीत. आज मुंबई पावसाने तुंबल्यानंतर नारायण राणे यांचे दोन्ही सुपुत्र नितेश राणे आणि निलेश राणे यांनी शिवसेनेवर जोरदार प्रहार केला आहे.

नितेश राणे यांनी आपल्या ट्वीटद्वारे महापालिका प्रशासनाचे कौतुक करणा-या सेलिब्रिटींना चांगलेच झोडले आहे. मुंबई महापालिका आणि बेबी पेंग्विनच्या उत्कृष्ट कामाबद्दल ट्वीट आणि इंन्स्टाग्रामवर कौतुक करणारे सेलिब्रिटी याबद्दल काय बोलणार? का मुंबईवरील प्रेमापेक्षा पैसा आणि लबाडी जास्त प्रिय वाटते?, अशा शब्दांत नितेश राणे यांनी टीका केली आहे.

तसेच निलेश राणे यांनी मुंबई महापालिका प्रशासनावर जोरदार टीका केली आहे. 100 टक्के नालेसफाई झाली असल्याचा दावा मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी केला, मात्र आज हे चित्र आहे. दरवर्षी मुंबई शहराला स्विमिंग पूल करण्याचं काम जो पक्ष 25 वर्ष करतोय, त्या शिवसेनेचं नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवलं पाहिजे. वाट लावली मुंबईची, अशी जोरदार टाकी निलेश राणे यांनी केली आहे.

तसेच भाजप आमदार आशिष शेलार यांनी सुद्धा सरकारवर जोरदार टीका केली आहे. मुंबईत दरवर्षीप्रमाणे पाणी तुंबलं आहे. घरात पाणी शिरू लागलंय. नालेसफाई कधी 107%, कधी 104% दाव्यांचे आकडे मोठ-मोठ्याने “वाझे”…
पहिल्या पावसातच “कटकमिशन”चे सगळे व्यवहार उघडे! मुंबईकर हो!
सत्ताधीशांचा हा वसुलीचा नाद खुळा, नेमेची येतो पावसाळा…
पाच वर्षांत 1 हजार कोटींचा घोटाळा!! अशी टीका आशिष शेलार यांनी केली आहे.

डेब्रीजच्या गोण्या जशाच्या-तशा नाल्यात पावसाचे पाणी मुंबईकरांच्या घरात… आणि मलाईच्या गोण्या मात्र कंत्राटदारांच्या खिशात! आता तरी मुंबईकरांची खरी काळजी करा!, अशीही टीका शेलार यांनी केली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.