कामाख्या देवीचा नवस फेडण्यासाठी गुवाहाटीला जाणाऱ्या शिंदे गटाच्या विमानात भाजपाचे दोन नेते दिसून आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. विशेष म्हणजे त्यातील एक विद्यमान मंत्री असून, शिवसेनेतील फुटीनंतर सुरत, गुवाहाटी व्हाया गोवा अशा बंडखोर आमदारांच्या प्रवासात या दोघांनीही साथ केली होती.
(हेही वाचा – शिंदे गटातील चार मंत्री, तीन आमदार आणि एका खासदाराची गुवाहाटी दौऱ्याला दांडी!)
शनिवारी सकाळी ९.३० वाजता १८७ प्रवाशांसह शिंदे गटाचे खासगी विमान गुवाहाटीच्या दिशेने झेपावले. मात्र, त्यात भाजपाचे नेते तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण आणि मोहित कंबोज दिसून आल्याने तर्कवितर्कांना उधाण आले आहे. हे दोन्ही नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या खास मर्जीतील मानले जातात.
शिंदे गटातील नाराज आमदारांना पुढच्या मंत्रिमंडळ विस्तारात सामावून घेण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. मात्र, इच्छुकांची संख्या अधिक आणि पदे कमी असल्याने शिंदेंसमोर पेच निर्माण झाला आहे. त्यामुळे दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्तारावेळी आमदारांची नाराजी पुन्हा उफाळून येऊ नये, यासाठी आमदारांना पुन्हा गुवाहाटीला नेण्याचे नियोजन शिंदे गटाकडून करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
आगामी मंत्रिमंडळ विस्तारात कोणाकोणाला संधी दिली जाईल, याबाबत शिंदे तेथे माहिती देतील. त्यानंतर जे नाराजी व्यक्त करतील, त्यांच्याशी वैयक्तिक चर्चा करून मनधरणी करण्याचा प्रयत्न होईल. काहींना चांगल्या महामंडळाचे आश्वासन, तर काहींना संघटनात्मक पातळीवर महत्त्वाची जबाबदारी दिली जाईल. त्यामुळे या सर्व घडामोडींवर बारीक लक्ष ठेवण्यासाठी फडणवीसांनी आपले शिलेदार पाठवलेत की काय, अशाही चर्चा सुरू झाल्या आहेत.
रवींद्र चव्हाण म्हणाले…
– एकनाथ शिंदे यांनी मला फोन करुन सांगितले की, रवी आपल्याला गुवाहाटीला देवीच्या दर्शनासाठी जायचे आहे. मुख्यमंत्र्यांचा आदेश असल्यामुळे मी गुवाहाटीला जात आहे.
– हे हिंदुत्त्ववादी विचारांचे सरकार आहे. या सगळ्यात आपल्याला देवाची साथ हवी आहे, असे रवींद्र चव्हाण यांनी सांगितले.
नवस फेडण्यासाठी – कंबोज
गुवाहाटीत असताना शिंदे-फडणवीस सरकार आकाराला आले. तेव्हा एकनाथ शिंदे यांनी राज्याला स्थिर सरकार मिळो, असा नवस केला होता. तो नवस फेडण्यासाठीच आम्ही गुवाहाटीला जात आहोत, अशी प्रतिक्रिया मोहित कंबोज यांनी दिली.
Join Our WhatsApp Community