भाजप नेत्यांना नकोय ‘दादा’गिरी!

शिवसेनेला अंगावर घेतल्याने सत्ताधाऱ्यांचे लक्ष्य बनलेले भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या कारकिर्दीत भाजपाला फारसे यश मिळताना दिसत नाही, त्यामुळे भाजपच्या नेत्यांमध्येही दादांच्या प्रती नाराजी आहे. 

शिक्षक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये भाजपला अपेक्षित यश न मिळाल्याने केंद्रीय नेतृत्व भाजपच्या राज्यातील नेत्यांवर प्रचंड नाराज असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळत असून, भाजपमध्ये येत्या काही दिवसात मोठ्या हालचाली होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे भाजपमधील राज्यातील नेत्यांमध्ये देखील सध्या अंतर्गत धुसफूस वाढत असल्याचे कळत आहे. त्याचाच एक भाग म्हणून माजी महसूल मंत्री आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रदेशाध्यक्ष पदावरून दूर करण्यात यावे, असा एक सूर देखील भाजपमध्ये तयार झाल्याचे खात्रीलायक सूत्रांकडून समजते.

प्रदेशाध्यपदी हवा तरुण चेहरा

सतत वादग्रस्त विधाने करणारे चंद्रकांत पाटील यांच्या जागी प्रदेशाध्यक्ष म्हणून नवीन तरुण चेहरा देण्याची मागणी आता काही जणांकडून व्यक्त होऊ लागली असून, यासाठी सध्या दिल्लीत देखील लॉबिंग सुरु झाले आहे. नुकताच एक भाजपचा मुंबईचा नेता दिल्लीत अमित शहा यांना भेटून आल्याचे देखील कळत आहे. मात्र, या नेत्याला देखील अमित शहा यांनी शिक्षक-पदवीधर मतदारसंघातील पराभवाबाबत चांगलेच फैलावर घेतल्याचे समजते. विशेष बाब म्हणजे राज्याचा आणि विशेषत: मुंबईतील राजकीय परिस्थितीचा आढावा अमित शहा यांना देण्यासाठी दिल्लीत गेलेल्या या नेत्यांने अमित शहा यांचा वाढलेला पारा बघताच तिथून पळ काढणे पसंत केल्याचे देखील खात्रीलायक सूत्रांकडून समजते.

आशिष शेलार यांच्यावर सोपवली महत्त्वाची जबाबदारी

विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षण मतदारसंघाच्या निवडणुकीत संभाजीनगर, पुणे नागपूर पदवीधर मतदारसंघ, पुणे शिक्षक मतदारसंघात भाजपचा दारुण पराभव झाला. नागपूरमध्ये तर भाजपच्या गडाला खिंडार पडले. हा पराभव भाजपच्या प्रचंड जिव्हारी लागला असून, या निवडणुकांमुळे भाजपमधील नाराजी तर जाहीररित्या पुढे आली आहे. यावरून पक्षात समन्वयाचा अभाव असल्याचे दिसून आले आहे. या पराभवाचे विश्लेषण करण्याची जबाबदारी भाजपचे आमदार व नेते अँड. आशिष शेलार यांच्यावर सोपवण्यात आली होती. पुणे, नागपूर व संभाजीनगरचा दौरा करून अहवाल सादर करण्याची जबाबदारी शेलार यांच्यावर सोपवली आहे.

(हेही वाचा : आता आला ब्रिटनवाला!)

उद्यापासून भाजपची संघटनात्मक बैठक

एकूणच विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपचा झालेला पराभव, आगामी पालिका निवडणुका यावर विचारमंथन करण्यासाठी ५ व ६ जानेवारी रोजी प्रदेश भाजपची संघटनात्मक बैठक होणार आहे. ५ तारखेला विविध संघटनात्मक बैठका होतील. पक्षाचे जिल्हा प्रभारी तसेच विविध मोर्चा व इतर विभागाच्या अध्यक्षांची आँनलाईन बैठक होईल. तर ६ जानेवारीला पक्षाच्या प्रदेश पदाधिका-यांची बैठक होईल. पक्षाचे केंद्रीय प्रभारी, सी. टी. रवी, विधानसभेतील विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील तसेच पक्षाचे इतर ज्येष्ठ नेते व पदाधिकारी यावेळी उपस्थित राहातील.

लवकरच अमित शहा महाराष्ट्राच्या दौऱ्यावर

सगळ्यात महत्त्वाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे फेब्रुवारी महिन्यात महाराष्ट्रात येत असून, ते ६ फेब्रुवारीला राणेंच्या मेडिकल कॉलेजच्या उद्घाटनाला सिंधुदुर्ग जिल्ह्यात येणार असल्याची माहिती देखील मिळत आहे. यावेळी अमित शहा हे राज्यातील भाजपच्या नेत्यांशी राज्यातील राजकीय परिस्थितीवर देखील चर्चा करणार असल्याचे समजते.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here