मुख्यमंत्रीपद गेल्याने वैफल्यग्रस्त झालेल्या उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन टीका करणे थांबवले नाही तर भाजपचे कार्यकर्ते कृतीने उत्तर देतील, असा इशारा भाजपचे विधान परिषद सदस्य आमदार प्रवीण दरेकर यांनी सोमवारी (२८ ऑगस्ट) दिला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी (२७ ऑगस्ट) हिंगोलीच्या सभेत बोलताना फडणवीस यांना टोला लगावला होता. ‘फडतूस’, ‘कलंक’, ‘थापाड्या’ म्हणणार होतो पण म्हणणार नाही, अशी तिरकस टीका ठाकरे यांनी केली होती. तसेच फडणवीस यांच्या जपान दौऱ्यावरूनही ठाकरे यांनी टीका केली होती. त्यावर भाजपने आज पलटवार केला.
हिंगोली येथील सभेत उद्धव ठाकरे यांनी अत्यंत असभ्य भाषेत देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. फडणवीस राज्यात गुंतवणूक आणण्यासाठी जपान दौऱ्यावर गेले होते. तुम्ही आरामासाठी परदेशात गेला होता. कोरोना काळात भ्रष्टाचाराने कलंकित झालेल्या उद्धव ठाकरेंना निष्कलंक देवेंद्र फडणवीसांवर टीका करण्याचा हक्क नाही. सत्ता हातून गेल्याच्या वैफल्यातून भ्रमिष्ट झालेले उद्धव ठाकरे बाष्कळ आरोप करत आहेत, अशी टीका दरेकर यांनी केली.
(हेही वाचा – Sachin Tendulkar : आमदार बच्चू कडू सचिन तेंडुलकरला कायदेशीर नोटीस पाठवणार)
उद्धव ठाकरेंना राज्य आणि देशाच्या विकासाशी काही देणेघेणे नाही. मुख्यमंत्री असताना ते केवळ घरच्यांच्या विकासात रममाण होते.केंद्राच्या लोकहितार्थ योजना कुठल्या हे देखील माहिती नसणारे उद्धव ठाकरे, ”उचलली जीभ लावली टाळ्याला” या उक्तीप्रमाणे पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका करतात. शिवसेनेसाठी आपल्या घराची राखरांगोळी करणाऱ्या कार्यकर्त्यांना आपण काय दिले हे उद्धव ठाकरेंनी स्वतःला विचारावे. कोणत्याही कोट्या आणि टीका न करता ठाकरे यांनी सलग एक तास केवळ विकासावर बोलून दाखवावे, असे आव्हान दरेकर यांनी दिले. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना राज्यातून अनेक प्रकल्प बाहेर गेले. शिंदे-फडणवीस-पवार सरकारच्या काळात राज्यात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक आल्याने महाराष्ट्र परकीय गुंतवणुकीमध्ये पुन्हा अव्वल स्थानावर गेला आहे, असा दावाही दरेकर यांनी केला.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community