पुढील वर्षी ७ राज्यांच्या विधानसभा निवडणुका येत आहेत. उत्तराखंड, हिमाचल, पंजाब, गोवा, मणिपूर, उत्तर प्रदेश आणि गुजरात या राज्यांत या निवडणुका होत आहेत. २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी या निवडणुका जिंकणे सर्वच पक्षांसाठी महत्वाचे ठरले आहे. याच पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांचे ‘मिशन २०२२ निवडणुका’ सुरू झाले आहे. यात ४० जागांसाठी गोव्यात आणखी २ नव्या पक्षांची एन्ट्री झाली आहे.
गोव्यात काँग्रेसला मोठा धक्का
गोव्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते लुईझिन्हो फालेरो यांनी आमदारकीचा राजीनामा देत त्यांनी थेट सोनिया गांधी यांना पत्र लिहिले आहे, त्यात ते म्हणतात, काँग्रेसकडे गोव्यात सर्वाधिक आमदार असूनही पक्षाला सरकार स्थापन करता आले नाही. याला कारणीभूत दिग्विजय सिंह आहेत, असे म्हटले आहे. या पत्रामुळे गोवा काँग्रेसमध्ये खळबळ उडाली. या पत्रात लुईझिन्हो फालेरो म्हणतात, २०१७ च्या निवडणुकीत काँग्रेसचे सर्वाधिक आमदार निवडून आले होते, काँग्रेसकडे आवश्यक २१ आमदारांचा पाठिंबा होता, मात्र तरीही गोवाचे प्रभारी दिग्विजय सिंह यांनी मला राज्यपालांकडे जाण्यापासून रोखले, त्यांनी मला आणखी ४ आमदारांच्या पाठिंब्यासाठी वाट पाहायला सांगितले, काँगेस पक्ष आपल्या गोवा युनिटसाठी निष्काळजीपणा करत आहे. गेल्या साडेचार वर्षांत मी पक्षाला प्रत्येक वेळी एकत्र करण्याचा प्रयत्न केला, परंतु प्रत्येक वेळी हायकमांडचे दुर्लक्ष झाले. मला पक्षाची पडझड रोखण्यासाठी आणि चांगले बदल घडवून आणण्याची कोणतीही अशा दिसत नाही, असे लुईझिन्हो फालेरो यांनी पत्रात म्हटले आहे.
साडेचार वर्षांत काँग्रेस सर्वात मोठ्या पक्षावरून सर्वात छोटा पक्ष
त्यांचे हे म्हणणे रास्त आहे, कारण मागील साडेचार वर्षांत काँग्रेसच्या आमदारांची संख्या १८ वरून चार वर आली आहे. १३ आमदारांनी काँग्रेस सोडून भाजपामध्ये प्रवेश केला. एकेकाळी सर्वाधिक आमदार असलेल्या काँग्रेसकडे आता केवळ ४ आमदार शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे काँग्रेसने गोव्यात सर्वात मोठा पक्ष ते सर्वात छोटा पक्ष हा प्रवास अवघ्या साडेचार वर्षांत पूर्ण केला. आता खुद्द लुईझिन्हो फालेरो यांनी काँग्रेसला सोडल्यामुळे काँग्रेसचे भवितव्य दिसत नाही. पुढच्या वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीआधी लुईझिन्हो फालेरो यांनी पक्ष सोडून जाणे हे पक्षाचे मोठे नुकसान मानले जात आहे. येणारी निवडणूक काँग्रेस तेथील प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांच्या नेतृत्वाखाली लढवणार आहे.
(हेही वाचा : वीर सावरकरांचा नितीन राऊतांकडून अवमान ! विरोध होताच पोस्ट केली डिलीट )
भाजपामध्ये फडणवीसांच्या नेतृत्वाखाली तयारी
भाजपने देवेंद्र फडणवीस यांना निवडणूक प्रभारी म्हणून नियुक्त केली आहे. त्यानंतर फडणवीस सक्रिय झाले, त्यांनी गोवा दौरेही सुरू केले. त्यांच्या सोबत गोव्या हे मुख्यमंत्री प्रमोद सावंत हेही सक्रिय झाले आहेत. मनोहर पर्रीकर गेल्यानंतर त्यांच्या जागी योग्य पर्यायाकडे लक्ष लागले आहे. त्यासाठी गोवेकरांचे पर्रीकर यांचा मुलगा उत्पल पर्रीकर याच्याकडे लक्ष लागले आहे. गेल्या वेळी भाजपाने उत्पल यांना संधी दिली नव्हती, मात्र आता उत्पल यांनी विधानसभेच्या जागेवर दावा ठोकला आहे.
आप आणि तृणमूलची चढाओढ लागली
गोव्यात आम आदमी पक्ष सक्रिय झाला आहे. ‘गोव्याला आता बदल हवा आहे. आमदार विकणारे आणि विकत घेणार बरेच पक्ष आहेत, बरेच घाणेरडे राजकारण सुरू आहे. गोव्याला आता विकास हवा आहे. निधीची काही कमतरता नाही. केवळ प्रमाणिक इच्छाशक्तीची गरज आहे. असे म्हणत आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी गोवा दौरा केला होता. गोव्यात आप पक्षाने मोर्चेबांधणी चालू केली आहे. तर दुसरीकडे तृणमूल काँग्रेसने गोव्याच्या निवडणुकीत उतरणार असल्याची घोषणा तृणमूलचे नेते डेरेक ओब्रायन यांनी केली आहे. गोव्यातील विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला मोठा झटका बसला आहे. माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते असलेल्या लुईझिन्हो फालेरो यांनी ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे राज्यात नवीन राजकीय समीकरणे तयार होतील, हे निश्चित आहे.
२०१२ मधील गोव्याची राजकीय स्थिती
गोव्यात सुरुवातीपासून काँग्रेसची ताकद होती. १९९३ पासून मधल्या काळातील ५ वर्षे वगळता २०१२ पर्यंत काँग्रेस सत्तेत होती. २०१२ साली गोव्यात भाजप सत्तेत आला त्यावेळी भाजपचे २१ आमदार निवडून आले होते. काँग्रेसचे ९, महाराष्ट्र गोमंतक पक्षाचे ३, गोवा विकास पार्टीचे २, तर ५ आमदार अपक्ष निवडून आले होते.
२०१७ मध्ये पराभूत भाजपाची सत्ता
पुढे २०१७ मध्ये काँग्रेसने ४० पैकी सर्वाधिक १९ आमदार जिंकले होते. तर १३ जागांवर भाजपाची पिछेहाट झाली होती. याशिवाय गोमंतक पक्षाने ३, गोवा फॉरवर्ड पक्षाने ३ तर २ अपक्ष आमदार निवडून आले होते, त्यावेळी काँग्रेसला सत्ता स्थापनेची संधी होती. मात्र बहुमत सिद्ध करेपर्यंत भाजपाने सत्ता स्थापनाही केली होती. ३० सदस्यांच्या घरात २१ हा जादुई आकडा गाठण्यासाठी भाजपाने गोवा फॉरवर्ड पार्टी, गोमंतक आणि दोन अपक्षांचा पाठिंबा मिळवून सरकार स्थापन केले होते.
२०२१ ची काय स्थिती?
एबीपी- सी वोटर यांनी सप्टेंबर महिन्यात केलेल्या सर्वेनुसार काँग्रेसला १५.४ टक्के, भाजपाला ३९.४ टक्के, आप पक्षाला २२.२ टक्के, तर इतर पक्षांना २३ टक्के मतदान होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे या निवडणुकीत भाजपाचे पारडे जड असणार आहे.
(हेही वाचा : पुण्यातील रिंग रोड प्रकल्प ३४ वर्षांपासून रखडला! नजर लागेल असा होता आराखडा)
Join Our WhatsApp Community