…म्हणून आशिष शेलारांना तिसऱ्यांदा बनवले भाजपने मुंबई अध्यक्ष!

82

भाजपच्या मुंबई अध्यक्षपदी पुन्हा ऍड आशिष शेलार यांची नियुक्ती करण्यात आली असून पक्षाचे मुंबई अध्यक्ष तिसऱ्यांदा बनवण्याचा मान भाजपमध्ये शेलार यांना मिळाला आहे. भाजपमध्ये आजवर तिसऱ्यांदा अध्यक्ष बनण्याचा मान माजी राज्यपाल राम नाईक यांना मिळाला होता. त्यामुळे प्रदेशाध्यक्ष बनण्याची प्रखर इच्छा असलेल्या आशिष शेलार यांची दुधाची तहान ताकावर भागवावी त्याप्रमाणे त्यांना प्रदेशाध्यक्षा ऐवजी मुंबई अध्यक्ष बनवून त्यांच्यावर पुन्हा मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीची जबाबदारी सोपवली. विशेष म्हणजे भाजपकडे मराठी चेहरा नसल्यानेच पुन्हा शेलारांची अध्यक्ष म्हणून नियुक्ती केल्याचेही बोलले जात आहे.

( हेही वाचा : ६०८ ग्रामपंचायतींसाठी १८ सप्टेंबरला मतदान; सरपंच पदासाठीही थेट निवडणूक)

मुंबई भाजपचे अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांची वर्णी राज्यातील सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रीपदी करण्यात आल्यानंतर या रिक्त जागी कुणाची वर्णी लागणार असा प्रश्न उपस्थित होत होता. त्यामुळे मुंबई अध्यक्षपदी प्रविण दरेकर, अमित साटम, अतुल भातखळकर, पराग अळवणी, मनोज कोटक, योगेश सागर आदींची नावे चर्चेत होती. परंतु यापूर्वी अमराठी व्यक्तीला मुंबईचे अध्यक्ष बनवल्याने आगामी महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या दृष्टीकोनातून मराठी व्यक्तीलाच मुंबई अध्यक्ष बनवण्याचा निर्धार भाजपने केला होता.

त्यामुळे मनोज कोटक, योगेश सागर आदींची नावे मागे पडली होती, तर प्रविण दरेकर हे बाहेरुन आलेले आहेत आणि अमित साटम आणि अतुल भातखळकर यांच्या नावावर काट मारल्याने मुंबई चेहरा आणायचा कुठून असा प्रश्न होता. आशिष शेलार यांच्याकडे आधीच मुंबई महापालिकेच्या निवडणूक संयोजन समितीचे अध्यक्षपद होते. परंतु यापूर्वी ते अध्यक्ष बनले होते. त्यामुळे शेलार यांचे नाव चर्चेत तेवढ्या प्रभावाने घेतले जात नसले तरी शेलारांवर पूर्ण जबाबदारी टाकल्याशिवाय महापालिका निवडणुकीचा निकाल मागील निवडणुकीतील यशाच्या तुलनेत दुपटीने येणार नाही. त्यामुळे शेलार यांच्यावर महापालिकेची पूर्ण जबाबदारी सोपवण्याच्यादृष्टीकोनातून भाजप श्रेष्ठीने यापूर्वीच्या प्रथा आणि परंपरेला छेद देत शेलार यांच्यावर तिसऱ्यांदा अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली असल्याचे बोलले जात आहे.

शेलार हे सन २०१३ पासून सलग सात वर्षे मुंबई भाजपचे अध्यक्ष होते. यावेळी तीन वर्षांचा अध्यक्ष पदाचा कालावधी असायचा. सन २०१७ च्या सार्वत्रिक निवडणुकीत त्यांनी शिवसेनेला शिंगावर घेत महापालिकेवर ८२ नगरसेवक निवडणूक आणले होते. विशेष म्हणजे शेलार यांनी निवडणुकीपूर्वी आपले ८० च्यावर नगरसेवक निवडून येतील असा दावा केला होता. परंतु आजवर २९ ते ३४ नगरसेवक निवडून येणाऱ्या भाजपचे ८०च्यावर नगरसेवक निवडून येण्याचा केवळ दावा पोकळ समजला जात होता, पण प्रत्यक्ष निवडणुकीत शेलार यांनी हा दावा खरा करून दाखवला होता. त्यामुळे शेलार यांची अभ्यासूवृत्ती आणि धाडसीवृत्ती यामुळे अन्य कुणावर मुंबई अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्याऐवजी शेलारांवर ही जबाबदारी सोपवली असल्याचेही बोलले जात आहे. शेलार यांच्यापूर्वी १९८० मध्ये मुंबई अध्यक्षपद हे दोन वर्षांकरता असायचे त्यावेळी १९८० ते १९८५ या कालावधीत सलग दोन वेळा राम नाईक हे अध्यक्ष बनले होते त्यानंतर १९९१ ते १९९३ या कालावधीतही राम नाईक मुंबईचे अध्यक्ष होते त्यामुळे राम नाईक यांच्या नंतर ३ वेळा अध्यक्ष बनण्याचा मान शेलारांना मिळाला आहे. त्यातच त्यांना प्रदेशाध्यक्षपद देता आलेले नाही आणि त्यानंतर मंत्रीपदीही त्यांची वर्णी न लावल्याने त्यांना महापालिका निवडणुकीत सक्रीय करून पूर्णपणे जबाबदारी सोपवण्यासाठी त्यांना निवडणूक संयोजन समितीचे अध्यक्ष पदा ऐवजी मुंबई अध्यक्ष बनवणे हाच पर्याय पक्षापुढे होता, असेही बोलले जात आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.