मुंबई महापालिकेतून विधान परिषदेत जाणाऱ्या दोन जागांपैकी एका जागेवर भाजपच्या वतीने महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते व माजी आमदार राजहंस सिंह यांचे नाव निश्चित झाले आहे. भाजप तर्फे कॉंग्रेसमधून भाजपात आलेल्या राजहंस सिंह यांची वर्णी लागली आहे. त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा शुक्रवारी भाजपने केली आहे.
विधान परिषदेत स्थानिक स्वराज्य संस्थेतून निवडून जाणाऱ्या सदस्यांपैंकी सहा सदस्यांचा कालावधी १ जानेवारी २०२२ रोजी संपुष्टात येत आहे. त्यामुळे या सहा जागांसाठी येत्या १० डिसेंबर रोजी निवडणूक होणार आहे. यामध्ये मुंबई महापालिकेतून दोन सदस्य निवडून जाणार आहेत.
विधान परिषदेसाठी भाजपाची नावे
- मुंबई – राजहंस सिंह
- कोल्हापूर – अमल महाडिक
- धुळे – अमरीश पटेल
- नागपूर – चंद्रशेखर बावनकुळे
- अकोला – वसंत खंडेलवाल
सध्या शिवसेनेचे रामदास कदम आणि काँग्रेसचे भाई जगताप हे आमदार असून त्यांच्या सदस्यत्वाचा कालावधी संपुष्टात येत असल्याने त्या रिक्त जागी यंदा शिवसेना आणि भाजपच्या नगरसेवकांची संख्या ८० पार असल्याने त्यांचे दोन सदस्य निवडून जाणार आहेत. त्यामुळे दरवेळी निराशा पदरी पडणाऱ्या भाजपच्या आशा पल्लवित झाल्या असून भाजप कुणाला उमेदवारी देते याकडे सर्वांचे लक्ष आहे. मात्र, सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार, महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते आणि दिंडोशी विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार राजहंस सिंह यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे. भारतीय जनता पार्टीच्या केंद्रीय कार्यालयाने विधान परिषदेवर जाणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली आहे. तब्बल आठ वर्षे ते महापालिकेत विरोधी पक्षनेते होते. दिंडोशी मतदार संघात २००९ मध्ये आमदार म्हणून निवडून आले होते, तर २०१४ मध्ये त्यांचा शिवसेनेचे आमदार सुनील प्रभू यांनी पराभव केला होता. दरम्यान, शिवसेनेच्यावतीने विधान परिषदेत माजी आमदार सुनील शिंदे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचीही माहिती मिळत आहे.