चंद्रकांतदादा म्हणताय, राज्यात कडक निर्बंध चालतील, पण…

138

गेली दोन वर्षे कोरोना महामारीमुळे बिघडलेले अर्थकारण आता रुळावर यायला लागले असताना राज्य सरकारने पुन्हा लॉकडाऊन लागू करू नये. कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याने सरकारने कडक निर्बंध लावले तर चालतील पण लॉकडाऊन नको, अशी भारतीय जनता पार्टीची भूमिका प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी पिंपरी चिंचवड येथे पत्रकारांशी बोलताना जाहीर केली.

काय म्हणाले चंद्रकांत पाटील

निर्बंधांना विरोध नाही पण लॉकडाऊनला कोणी तयार होणार नाही. गेली दोन वर्षे विद्यार्थी, खेळाडू, व्यापारी, उद्योजक अशा विविध घटकांनी खूप नुकसान सहन केले. हा मोठा कालावधी आहे. आता आणखी किती सहन करणार हा सवाल आहे. त्यामुळे राज्य सरकारने हवे तर कडक निर्बंध लावावेत पण सर्व काही बंद करण्याची भूमिका असू नये. तसेच कोरोनाचे स्वरुप आता भयानक नाही आणि ही साथ संपण्याची शक्यता आहे, हे तज्ञांचे मतही सरकारने ध्यानात घ्यावे. पुण्यातील कोरोना आढावा बैठकांमध्ये आपण गेली दीड वर्षे उपस्थित राहिलो नसल्याबद्दल माध्यमांनी प्रश्न उपस्थित केला. पण त्या बैठकांमध्ये अरेरावी चालते. उपस्थितांच्या सूचनांना वाटाण्याच्या अक्षता लावल्या जातात. अशा स्थितीत बैठकांना उपस्थित राहण्याची औपचारिकता कशाला, असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी केला.

(हेही वाचा – दिल्लीच्या चांदनी चौकात भीषण अग्नितांडव! अग्निशमन दलाच्या १२ गाड्या दाखल)

ठाकरे खऱ्या शिवसैनिकांना दाबून ठेऊ शकणार नाहीत

ते पुढे असेही म्हणाले, शिवसेनेतील अस्वस्थता हळुहळू बाहेर पडू लागली आहे. काही शिवसैनिक खासगीत बोलतात तर काही नेते उघड बोलतात. शिवसेना किंवा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे खऱ्या शिवसैनिकांना फार काळ दाबून ठेऊ शकणार नाहीत. शिवसेनेला खऱ्या हिंदुत्वाकडे जावेच लागेल. शिवसेनेसोबत भाजपाची युती होऊ शकते का, असे विचारले असता ते म्हणाले, अशा शक्यतेबाबत आपल्याला काही माहिती नाही. राजकारणात कधीही काही होऊ शकते, पण त्याबद्दल सांगता येत नाही. सामान्य माणसाची इच्छा आहे की, दोन भावांमध्ये भांडणे झाली तरी केव्हा तरी भांडणे संपवून पुन्हा जुने संबंध निर्माण करावे लागतात. तथापि, आपण युतीबद्दल काही बोलणार नाही. तसे बोलले की, लगेच शिवसेनेच्या मुखपत्रातून आपल्यावर सत्ता गेल्यामुळे झोप लागत नाही, अशी टीका होते. प्रत्यक्षात आपल्याला शांत झोप लागते, असा टोला त्यांनी लगावला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.