राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर शिंदे गटात ठाकरे गटातून येणा-या नेत्यांची संख्या वाढलेली असताना आता भाजपमध्येही राष्ट्रवादी काँग्रेसमधून इनकमिंग होणार असल्याचा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रचंड असंतोष असून, 2024 मध्ये तो बाहेर येईल, असा धक्कादायक खुलासा बावनकुळे यांनी केला आहे. त्यांच्या या दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे.
राज्यात सत्ता गेल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रचंड प्रमाणात असंतोष आहे. राष्ट्रवादीतील कार्यकर्ते आणि नेते यांचा स्वभाव सत्तेशिवाय राहण्याचा नाही. त्यामुळे त्यांच्यातील हा असंतोष 2024 पर्यंत बाहेर येईल, असे बावनकुळे यांनी सांगलीतील पत्रकार परिषदेत म्हटले आहे.
(हेही वाचाः ‘त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आणि आमच्यात दुरावा आला’, अंधारेंच्या विभक्त पतीचा खुलासा)
बाहेर पडणा-यांची यादी मोठी आहे
सत्तेपासून पैसा आणि पैशातून सत्ता असं राष्ट्रवादी काँग्रेसचं धोरण असल्यामुळे जिल्ह्यातील एकच माणूस मोठा होतो आणि तोच सगळं कमावतो. त्यामुळे राष्ट्रवादीचा स्थानिक कार्यकर्ता हा त्याच पातळीवर राहतो, त्याला कधीच आमदार,खासदार पदापर्यंत पोहोचता येत नाही. त्यामुळेच राष्ट्रवादीतील हा असंतोष बळावला आहे.
(हेही वाचाः सुषमा अंधारे यांचे विभक्त पती शिंदे गटात येणार, अंधारे यांच्यावर केली जोरदार टीका)
राष्ट्रवादीतून बाहेर पडणा-यांची यादी इतकी मोठी आहे की त्यावर आम्हाला विचार करावा लागत आहे. त्यामुळे 2024 मध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी आणि ठाकरे गटाला लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारही सापडणार नाहीत, असा दावा बावनकुळे यांनी केला आहे.
Join Our WhatsApp Community