मनसे-भाजप युती होणार? बावनकुळे राज ठाकरेंना भेटायला जाणार

117

गेल्या काही महिन्यांत मनसेने हिंदुत्ववादाची भूमिका घेतल्यापासून मनसे आणि भाजप एकत्र येणार असल्याच्या चर्चा अनेकदा होताना दिसत आहेत. त्यातच नव्याने स्थापन झालेल्या शिंदे-फडणवीस सरकारलाही मनसेने पाठिंबा दिल्यामुळे या चर्चांना अधिकचं खतपाणी मिळालं. त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये मनसे-भाजप युती होण्याची शक्यता वर्तवण्यात येत असतानाच भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी या युतीबाबत भाष्य केले आहे.

राज ठाकरेंची भेट घेणार

राज ठाकरे यांनी घेतलेल्या भूमिकेबाबत जनता काय तो निर्णय घेईल. पण पक्ष वाढवण्यासाठी राज ठाकरे यांनी हिंदुत्वाची घेतलेली भूमिका ही अतिशय योग्य आहे. राज ठाकरे हे सध्या महाराष्ट्र पादाक्रांत करत आहेत. त्यांच्यासोबत आमचे खूप चांगले संबंध आहेत. प्रत्येक पक्षाची भूमिका कशीही असली तरी व्यक्तिगत संबंधात कधीही राजकारण येत नाही. त्यामुळे आपण लवकरच राज ठाकरे यांची भेट घेणार असल्याचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे.

(हेही वाचाः ‘लॉटरीमध्ये विरोधी पक्षनेतेपद मिळालं म्हणून बारामतीच्या पोपटाने बरळू नये’, मनसेचा दानवेंना थेट इशारा)

उद्धव ठाकरेंना टोला

उद्धव ठाकरे हे आपल्या पक्षातील 40 आमदारांना सोडायला तयार आहेत पण सत्ता आणि शरद पवार यांना सोडत नाहीत. अनिल देशमुख, नवाब मलिकांसारख्या घोटाळेबाज नेत्यांना त्यांनी आपल्या मंत्रिमंडळात स्थान दिले. तसेच स्वातंत्र्यवीर सावरकरांवर काँग्रेसने केलेल्या आरोपांवरही उद्धव ठाकरे यांनी कोणतीही कठोर भूमिका घेतली नाही. त्यामुळे उद्धव ठाकरे हे आता हिंदुत्वापासून दूर गेले असल्याचे स्पष्ट होत आहे, असा टोलाही चंद्रशेखर बावनकुळे यांनी लगावला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.