विधानभवनात मनासारखे केबिन न मिळाल्यामुळे रुसलेल्या एका भाजपाच्या मंत्र्याने चक्क पावसाळी अधिवेशन संपेपर्यंत त्या केबिनमध्ये पाऊल ठेवले नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे त्याच्या दिमतीला असलेल्या अधिकाऱ्यांची मोठी गैरसोय झाली, त्यांना मंत्रालयातील दालनातून सगळा कारभार हाताळावा लागला.
खान्देशातील मातब्बर मानला जाणारा हा नेता १९९५ पासून कधी युती, तर कधी आघाडी सरकारमध्ये मंत्री राहिला आहे. महाविकास आघाडी सरकार कोसळून भाजपा-शिवसेनेचे सरकार सत्तेत आल्यानंतर या नेत्याची कॅबिनेट मंत्रीपदी वर्णी लागली. जेष्ठता आणि राजशिष्टाचारानुसार विधानमंडळ सचिवालयाने मागील दोन अधिवेशनात त्यांना तळ मजल्यावरील २५ क्रमाकांचे दालन वितरित केले. विधिमंडळाच्या परंपरेनुसार तळ मजल्यावरील दालने ज्येष्ठ मंत्र्यांना दिली जातात.
मात्र, यावेळी राजशिष्टाचार आणि जेष्ठतेच्या नियमाला बगल देऊन या मंत्र्याला पहिल्या मजल्यावरील १३० क्रमांकाचे केबिन देण्यात आले. आपल्याला नवख्या मंत्र्यांच्या रांगेत बसवल्याचा राग आल्याने या नेत्याने थेट विधानसभा अध्यक्षांकडे धाव घेतली. मात्र, त्यांनी त्याची दाखल घेतली नाही. त्यामुळे रुसलेल्या या मंत्र्याने अधिवेशन संपेपर्यंत १३० क्रमांकाच्या दालनात पायसुद्धा ठेवला नाही.
(हेही वाचा – Covid Centre scam : माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर गुन्हा दाखल)
तळ मजल्यावर दालन का नाही?
- अजित पवारांसह राष्ट्रवादीच्या ९ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यामुळे दालन वाटपाचा क्रम बदलावा लागला. छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील यांच्यासारखे ज्येष्ठ नेते मंत्रिमंडळात सहभागी झाल्याने त्यांना तळमजल्यावरील दालन देणे भाग पडले.
- अशावेळी राधाकृष्ण विखे पाटील, सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील यांच्या दालनांना हात न लावता ‘या’ ज्येष्ठ मंत्र्यांला वरच्या मजल्यावर पाठवण्यात आले. त्याची आधीची २५ नंबरची केबिन बदलून थेट १३० क्रमांकाच्या केबिनमध्ये पाठवण्यात आले.
- त्यामुळे आपल्याला नवख्या मंत्र्यांच्या यादीत बसवल्याने नाराज झालेल्या या मंत्र्याने शेवटपर्यंत दालनात पाऊल ठेवले नाही. उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्या दालनात बसून त्याने तात्पुरता कारभार पहिला. त्याच्या दिमतीला असलेले अधिकारी आणि कर्मचारी कधी मंत्रालयात, तर कधी इतर सहकाऱ्यांकडे बसत होते.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community