शिवतीर्थावरील दसरा मेळाव्याची परवानगी कोणालाच मिळणार नाही, ‘या’ भाजप मंत्र्यांचा दावा

106

यंदा शिवतीर्थावर शिवसेनेचा की शिंदे गटाचा दसरा मेळावा होणार, यावरून राजकारण चांगलेच तापले आहे. दरम्यान, शिवाजी पार्कमध्ये परंपरेनुसार दसरा मेळावा आयोजित करण्यासाठी शिवसेनेने २२ ऑगस्ट रोजी पालिकेच्या दादर जी-उत्तर विभाग कार्यालयात अर्ज दाखल केला. त्या पाठोपाठ ३० ऑगस्टला शिंदे गटानेही अर्ज दिला आहे. यानंतर शिवसेना आणि शिंदे गटात गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या राजकीय वादाच्या पार्श्वभूमीवर राज्यतील सत्तेच्या जोरावर शिंदे मैदान मारणार की दरवर्षीप्रमाणे ते सेनेला मिळणार यावरून जोरदार चर्चांना उधाण आले आहे. अशातच भाजपच्या एका मंत्र्याने केलेल्या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगण्यास सुरूवात झाली आहे.

(हेही वाचा – अमरावतीमधील ‘लव्ह-जिहाद’ प्रकरणातील ‘ती’ तरुणी सापडली साताऱ्यात! )

“शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्यासाठी शिवसेनेचे उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये चुरशीची लढत पाहायला मिळत असून मुंबईच्या नागरी संस्थांकडून दोन्ही गटाची परवानगी नाकारली जाऊ शकते. तर दुसऱ्या ठिकाणी मेळावा घेण्याच्या सूचना देण्यात येऊ शकतात.” असा दावा भाजपचे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केला आहे. तर शिवसेना आणि शिंदे गटातील वाद सर्वोच्च न्यायालयात गेला आहे. एकनाथ शिंदे यांच्याकडे पक्षातील ४० आमदार असल्याने ते पक्षाच्या नावावर आणि चिन्हावर दावा करू शकतात असेही मुनगंटीवार म्हणाले आहेत. दसरा मेळाव्यासाठी राज्य सरकारकडून कोणत्याही मैदानावर निर्बंध घातले गेले नाही अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात दिल्याचेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी बंड करत राज्यात सत्तांतर घडवून आणल्यानंतर आता शिवसेना आणि शिंदे गटात वाद निर्माण झाला आहे. दसरा मेळावा हा शिवसेनाचा महत्त्वाचा कार्यक्रम असून यावर्षीचा दसरा मेळावा कोण घेणार याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मात्र या दसरा मेळाव्यासाठी आता महापालिकेचे आयुक्त निर्णय घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. कारण सध्या महापालिकेचा कार्यकाळ संपल्याने प्रशासकांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर अजून निवडणुका जाहीर झाल्या नाहीत त्यामुळे परवानगीचा निर्णय महापालिका आयुक्त देतील असेही त्यांनी म्हटले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.