कर्नाटक निवडणूक निकालानंतर सतर्क झालेल्या भाजपाने महाराष्ट्रावर विशेष लक्ष केंद्रित केले असून, राज्य मंत्रिमंडळातील स्वपक्षाच्या मंत्र्यांवर अतिरिक्त जबाबदारी दिली आहे. त्यानुसार, दर शुक्रवारी हे मंत्री राज्यातील एकेका जिल्ह्याचा दौरा करतील आणि संघटनात्मक बांधणीवर भर देतील.
शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळात सध्या भाजपाचे ९ मंत्री आहेत. या सर्वांवर पहिल्या टप्प्यात दोन जिल्ह्यांची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यानुसार राधाकृष्ण विखे पाटील नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर, सुधीर मुनगंटीवार गडचिरोली आणि वर्धा, चंद्रकांत पाटील सांगली आणि सातारा, विजयकुमार गावित धुळे आणि जळगाव, गिरीश महाजन धाराशिव आणि बीड, सुरेश खाडे सोलापूर आणि कोल्हापूर, रवींद्र चव्हाण ठाणे आणि मुंबई शहर, अतुल सावे परभणी आणि लातूर, मंगलप्रभात लोढा मुंबई शहर आणि रत्नागिरीचा दौरा करतील.
(हेही वाचा – Eknath Shinde : एकनाथ शिंदेंनी घेतला देवेंद्र फडणवीसांच्या महत्त्वाकांक्षी योजनेचा आढावा)
पुढच्या टप्प्यात या मंत्र्यांकडे आणखी दोन जिल्ह्यांची जबाबदारी दिली जाईल. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार हा कार्यक्रम तयार केला आहे. संबंधित मंत्र्यांनी दिलेल्या जिल्ह्यात शुक्रवारी संपूर्ण दिवस विविध कार्यक्रम घ्यावेत. त्यापैकी किमान सहा तास संघटनात्मक कामकाजाकरिता राखीव ठेवावे आणि उर्वरित वेळ शासकीय कामकाजासाठी द्यावा. प्रवास पूर्ण झाल्यावर लगेच प्रवासाचा सविस्तर अहवाल प्रदेश भाजपाकडे पाठवावा, अशी सूचना करण्यात आली आहे. त्यामुळे पुढचे काही महिने भाजपाचे मंत्री शुक्रवारी मंत्रालयात दिसणार नाहीत.
कोणकोणते कार्यक्रम घेणार?
- बुथ प्रमुखांकडे बुथ सशक्तीकरण अभियानाची एक बुथ बैठक लावणे
- शक्तीकेंद्र प्रमुखांसमवेत एक बैठक लावणे.
- जिल्हा / शहर कोअर ग्रुप बैठक मंडळ अध्यक्षांसह संघटनेबाबत आढावा घेणे
- शासकीय अधिकारी परिचय (जिल्हा / शहर कोअर ग्रुप + मंडल अध्यक्षांसोबत)
- युवा मोर्चाच्या युवा वॉरियर्सच्या एका शाखेचे तरी उद्घाटन करावे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community