२०२४ साली होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाने ‘मिशन २००’ आखले आहे. यांतर्गत २०१९ला गमावलेल्या जागांवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. अशावेळी एका काँग्रेस आमदाराने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
संग्राम थोपटे यांच्याबाबत चर्चा
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गुरुवार, ५ डिसेंबर रोजी पुणे दौऱ्यावर होते. त्यावेळी काँग्रेसचे भोर मतदारसंघाचे आमदार संग्राम थोपटे यांनी त्यांची भेट घेतली. विशेष म्हणजे याच दिवशी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेही पुणे दौऱ्यावर होते. त्यांनी बारामतीत कार्यकर्ता मेळावा घेतला. पण, संग्राम थोपटे यांनी त्याकडे दुर्लक्ष करीत फडणवीसांची भेट घेतली. त्यामुळे ते भाजपाच्या वाटेवर आहे का, अशा चर्चा सुरू झाल्या आहेत.
(हेही वाचा बच्चू कडूंचे विधान परिषद निवडणुकीत ‘बंड’; पाचही जागा लढवणार)
प्रदेशाध्यक्ष पटोले यांनीही भेटीचा केली खुलासा
पुणे जिल्ह्यात कॉंग्रेसचे दोन आमदार आहेत. पुरंदरमधून संजय जगताप व भोरमधून संग्राम थोपटे. पुण्यात राष्ट्रवादीचा वरचश्मा असतानाही, या दोन तालुक्यात कॉंग्रेसने आपला झेंडा कायम राखला आहे. मात्र, पुण्यातील काही आमदार भाजपाच्या संपर्कात असल्याची चर्चा अधून-मधून होत असते. त्यामुळे आमदार थोपटे यांच्या भेटीचे वेगळे अर्थ काढण्यात येऊ लागल्याने प्रदेशाध्यक्ष पटोले यांनाही या भेटीचा खुलासा करावा लागला.
नाना पटोलेंची सारवासारव
साखर कारखानदारीच्या प्रश्नाबाबत आमदार संग्राम थोपटे दिल्लीला गेले होते. तेथून परत आल्यानंतर त्यांनी अर्थमंत्री या नात्याने देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. मात्र, यातून राजकीय अर्थ काढण्याची गरज नाही थोपटे परिवार कायमच कॉंग्रेस सोबत होता आणि तो कायमच असेल, असे स्पष्टीकरण नाना पटोले यांनी दिले.
Join Our WhatsApp Community