मुंबई महापालिकेने सर्वेमध्ये पात्र ठरलेल्या फेरीवाल्यांचे पुनवर्सन करण्यासाठी फेरीवाला क्षेत्र बनवले असले तरी अद्यापही यावर प्रशासनाकडून कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळे महापालिका प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी अंधेरी पश्चिम विधानसभेचे भाजपचे आमदार अमित साटम यांनी फेरीवाला क्षेत्रांमध्ये दिवाळी बाजार भरवून महिला बचत गटांना स्टॉल्स लावण्याची संधी मोफत उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे जे पात्र फेरीवाले आहेत त्यांचे पुनर्वसन या फेरीवाला क्षेत्रामध्ये करून रस्ते आणि पदपथ नागरिकांना चालण्यास मोकळे करून देण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
अंधेरी वर्सोवा लिंक रोडला जोडणाऱ्या एका रोडवर महापालिकेने फेरीवाला क्षेत्र जाहीर केले आहे. मात्र, हा रस्ता असाच पडून असून दुसरीकडे फेरीवाल्यांनी रस्ते व पदपथ अडवून ठेवले आहे. त्यामुळे दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर भाजपचे स्थानिक आमदार अमित साटम यांनी या जागेत मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँक प्रायोजित महिला बचत उत्पादित वस्तूंच्या विक्रीसाठी दिवाळी बाजाराचे आयोजन केले आहे. दिवाळीच्या सणामध्ये महिला बचत गटांना मदतीचा हात देताना प्रस्तावित फेरीवाला क्षेत्राचे मॉडेलही तयार करून देत याठिकाणी फेरीवाले व्यवसाय करू शकतात हे दाखवून देण्याचा प्रयत्न अमित साटम यांनी केला.
( हेही वाचा: Local Update: कामावर जाणा-यांसाठी मोठी बातमी; मध्य रेल्वेची लोकलसेवा उशिराने )
यासंदर्भात बोलताना अमित साटम यांनी अंधेरी पश्चिम येथील प्रस्तावित फेरीवाला क्षेत्रामध्ये दिवाळी बाजाराचे आयोजन करत त्याठिकाणी दोन बाय दोन फुटांचे स्टॉल्स देत मॉडेल प्रस्तावित फेरीवाला क्षेत्र तयार केले आहे. या प्रस्तावित फेरीवाला क्षेत्रामध्ये अंधेरी पश्चिम येथील जे फेरीवाले रस्त्यांवर तसेच पदपथावर बसत आहेत आणि त्यांच्यावर वारंवार कारवाई होते, अशा पात्र फेरीवाल्यांचे याठिकाणी पुनर्वसन करून कायमस्वरुपी फेरीवाला क्षेत्र तयार केले जावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. या प्रस्तावित फेरीवाला क्षेत्रामध्ये पात्र फेरीवाल्यांना स्थलांतरीत जागा करून या ठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाचे शॉपिंग स्ट्रीट बनवू शकतो. त्यामुळे, फेरीवाले, फेरीवाल्यांच्या संघटना आणि महापालिका प्रशासनाला साटम यांनी विनंती करत के-पश्चिम विभागातील पात्र फेरीवाल्यांना शिफ्ट करावे आणि या फेरीवाल्यांना त्याठिकाणी लागणारे आर्थिक पाठबळ मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून उपलब्ध करून दिले जाईल, असे आश्वासन बॅंकेचे अध्यक्ष प्रविण दरेकर यांनी दिल्याचे त्यांनी सांगितले.
Join Our WhatsApp Community