महाविकास आघाडीने महाराष्ट्राला कोरोनाची राजधानी बनवले आहे. रुग्णांना सुविधा देण्यात सरकार कमी पडले. ज्या महाराष्ट्राची ओळख सकारात्मक होती, त्याला गालबोट लावण्याचे काम आघाडी सरकारने केले आहे. राज्यात दोन महिन्यांत ५५.१९ टक्के मृत्यू झाले आहेत. शहरातला कोरोना आता ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर पसरला आहे. हे सरकार लोकांच्या कामाचे नसून रक्तपिपासू बनले आहे, अशी टीका भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी केली. ते सांगली येथे पत्रकार परिषदेत बोलत होते. आमदार आशिष शेलार पश्चिम महाराष्ट्र दौऱ्यावर असून, सोमवारी त्यांनी सांगली शहर व ग्रामीण जिल्हा कोअर कमिटीच्या बैठका घेतल्या.
सरकारचा दुटप्पीपणा
सर्वच बाबतीत अपयशी ठरलेल्या राज्य सरकारला लोकांच्या हिताचे देणे-घेणे नाही. कोरोनाचा संसर्ग रोखण्यात हे सरकार पूर्ण अपयशी ठरले आहे. राज्यात रुग्णांचा मृत्यूदर गेल्या दोन महिन्यांत ५५.१९ टक्क्यांवर पोहोचला आहे. रुग्णांना वेळेत उपचार मिळत नाहीत. महाविकास आघाडी सरकारने राज्याला देशात कोरोनाची राजधानी बनवले आहे. केंद्र सरकारने दिलेल्या लसी लोकांना देण्यात नियोजनाचा अभाव असल्याने, हे केंद्र सरकारला दोष देत दुटप्पीपणा करत आहे. केवळ राजकारण करायचे काम सुरू आहे. यातून या सरकारने बाहेर पडलं पाहिजे, अशी टीका शेलार यांनी केली आहे.
(हेही वाचाः नानांचा आधी स्वबळाचा नारा, आता थेट मुख्यमंत्री- उपमुख्यमंत्र्यांवर टीका!)
आरक्षणाविरोधात कुटील डाव
ठाकरे सरकारची वृत्ती रक्त पिपासूसारखी आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासह शेतकऱ्यांचे प्रश्न, खतांचे वितरण, बोगस बियाणे, पीक विमा या बाबतही सरकार अपयशी ठरल्याचे शेलार म्हणाले. मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारने सरकारी वकिलांना योग्य माहिती दिली नाही, सहकार्य केले नाही, असे सरकारी वकील मुकुल रोहतगी यांनी स्वतः सर्वोच्च न्यायालयात राज्य सरकारच्या असहकार्याबद्दल भाष्य केले होते. यातून राज्य सरकारचा मराठा आरक्षणाविरोधातील कुटील डाव स्पष्ट होतो, असे शेलार म्हणाले. ओबीसी आरक्षणाबाबत हीच परिस्थिती आहे. केवळ केंद्र सरकारकडे बोट दाखवण्याचे काम केले जाते आणि जनतेमध्ये संभ्रम पसरवला जातो, असा आरोप त्यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन केला आहे.
(हेही वाचाः लोक बेरोजगार झाले, पण मोदींना विश्वगुरू व्हायचं आहे! मल्लिकार्जुन खरगेंचा आरोप)
Join Our WhatsApp Community