नालेसफाई नाही, ही तर हातसफाई! शेलारांची टीका

मुंबईकरांची फसवणूक करणारे प्रशासन आणि शिवसेनेला सभागृहात उत्तर देऊ.

78

मुंबई शहरातील १०७ टक्के नाल्यांची सफाई झाल्याचा दावा महापौर किशोरी पेडणेकर यांनी केला होता. भाजपने सोमवारी शहरातील नाल्यांची पाहणी करुन, महापौरांचा १०७ टक्के नालेसफाई केल्याचा दावा फोल ठरवला आहे. ही नालेसफाई नव्हे तर हातसफाई केली आहे, अशी टीका भाजप आमदार आशिष शेलार यांनी केली आहे.

सभागृहात उत्तर देऊ

मुंबई शहरातील नालेसफाईचा आढावा घेण्यासाठी भाजप नेते व आमदार आशिष शेलार, भाजप गटनेते प्रभाकर शिंदे, पक्षनेता विनोद मिश्रा, स्थायी समिती सदस्य भालचंद्र शिरसाट व भाजप नगरसेवक यांनी शहरातील नालेसफाईचा पाहणी दौरा पूर्ण केला. यादरम्यान स्थानिक नागरिकांनीही नालेसफाईबाबत तक्रारी केल्या. नालेसफाईबाबत पालिका प्रशासन आणि शिवसेना मुंबईकरांच्या डोळ्यात धुळफेक करत आहे. नाल्यांमध्ये कचरा असल्याने पावसाळ्यात ते तुंबून त्याचा मुंबईकरांना फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. मुंबईकरांची फसवणूक करणारे प्रशासन आणि शिवसेनेला सभागृहात उत्तर देऊ, असा इशारा भाजप गटनेते प्रभाकर शिंदे यांनी दिला.

(हेही वाचाः मुंबईतील नाले गाळ आणि कचऱ्याने भरलेले! काँग्रेसकडून पोलखोल!)

या नाल्यांमध्ये अजूनही गाळ

इतके दिवस महापौर कार्यालयात बसून नालेसफाई १०७ टक्के पूर्ण झाल्याचा दावा करणाऱ्या महापौरांना, भाजपच्या नालेसफाई पाहणीनंतर जाग आली. त्यानंतर त्यांनी दुसऱ्या दिवशीच तात्काळ नालेसफाईसाठी दौरा आखला असल्याची टीका भाजप गटनेते प्रभाकर शिंदे यांनी केली. त्याचबरोबर गजधरबंध, पीएनटी नाला, पोईसर नदी, जनकल्याण नगर नाला, वळनाई नाला, सोमैय्या नाला, जिजामाता नगर माहुल नाला हे सर्व नाले अद्याप गाळ, दगडमाती यांनी भरलेले आहेत. मुंबईच्या महापौर या नाल्यांचा दौरा करुन १०७ टक्के नालेसफाई झाल्याचा दावा करतील काय? असा प्रश्नही गटनेते प्रभाकर शिंदे यांनी उपस्थित केला.

कोट्यावधी रुपये पाण्यात

मुंबईकर नागरिकांच्या जीवाशी महापालिका खेळ खेळत असल्याची टीका आमदार शेलार यांनी केली. दरवर्षी नालेसफाई होतच नाही, परंतु पैसे काढले जातात. कोट्यावधी रुपये पाण्यात घालण्याचे काम महापालिका करत असल्याचा आरोप त्यांनी केला.

(हेही वाचाः नालेसफाईच्या कामांबाबत राष्ट्रवादी काँग्रेस नाराज!)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.